पुण्याचे अलका टॉकीज विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (13:30 IST)
एखादा सिनेमा शालेय विद्यार्थ्यांनी हाऊसफुल्ल करावा, या सारखे मराठी चित्रपटसृष्टीचे भाग्य ते कोणते? खरंच! मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा भाग्याचा क्षण म्हणावा लागेल. कारण, मास फिल्म्स प्रस्तुत, महेश काळे दिग्दर्शित घुमा या सिनेमासाठी चक्क पुण्याच्या महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाने आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी बुधवार ४ ऑक्टोबर रोजी अलका टॉकीज पूर्णपणे आरक्षित केले आहे. सिनेरसिकांबरोबर अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध मराठी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना घुमा सिनेमा दाखविण्यासाठी सिनेमागृहांचे आगाऊ आरक्षण केले आहे. शहारांमधून-गावांमधून शाळा ते सिनेमागृहापर्यंत प्रभातफेरी काढून विद्यार्थांचे जथ्थे सिनेमा पाहण्यासाठी येत आहेत.

पुण्याच्या अलका टॉकीजची क्षमता ही ८६३ आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी एखादा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहाणं, ही कदाचित सिनेविश्वातील पहिलीच वेळ असावी, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी हा सिनेमा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिला होता आणि त्याचक्षणी त्यांनी निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी इच्छा व्यक्त केली होती.. त्यामुळे घुमा प्रदर्शित झाल्यावर त्यांनी निर्माते मदन आढाव यांना संपर्क करून माहिती घेतली व बुधवार 4 ऑक्टोबर रोजी संपूर्णत:थिएटर आरक्षित करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी घुमाचा विशेष खेळ आयोजित केला. आगाऊ रकमेचा पूर्ण धनादेश डॉ. विकास आबनावे यांनी निर्माते मदन आढाव यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार मोहनदादा जोशी, प्रशांत सुरवसे, चेतन अगरवाल, पुष्कर आबनवे, पवन नाईक तसेच मास फिल्म्सचे आदिनाथ धानगुडे उपस्थित होते.

इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी माध्यामांच्या शाळांना गळती लागली आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा रुबाब पाहून मराठी शाळेत शिकणं कमीपणाचे वाटू लागले आहे. त्यात शिकवणी सोडून शिक्षकांना इतर कामांना जुंपले जात असल्याने आणि वेळेवर मानधन न मिळत असल्याने सरकारी आणि सरकारमान्य शाळांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी घुमा हा उत्तम पर्याय ठरतोय. मराठी माध्यमात शिकलेल्या, शिकणाऱ्या आणि शिकविणाऱ्यांचे मनोबल मनोरंजनाच्या माध्यमातून वाढवणारा घुमा हा सिनेमा असल्याने इंग्रजी माध्यामामुळे परिणाम झालेल्या मराठी शाळांना घुमा पाहावासा वाटणे स्वाभाविक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती