प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी झाले स्वप्नील जोशीचे काका...

सोमवार, 15 एप्रिल 2019 (14:52 IST)
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या काकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी साकारत आहेत. या चित्रपटात ते नाट्य दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’१४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या काकाची भूमिका साकारत आहेत. हे सुनीलच्या खूप जवळचे आणि मैत्रीपूर्ण असे पात्र आहे. दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटामध्ये सुद्धा एका दिग्दर्शकाचीच भूमिका साकारली आहे.
 
‘पैशांनी श्रीमंत होणं सोपं, नात्यांनी समृद्ध होण कठीण’ या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचे काका झालेले चंद्रकांत कुलकर्णी हे स्कूटरवर स्वार झाले आहेत. त्यांची केमिस्ट्री त्यातून व्यक्त होते. त्यांच्यातील नात्याचा आणि त्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.
 
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी १९९५ साली आलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित ‘बनगरवाडी’ या चित्रपटामध्ये अभिनय केला होता. त्याचबरोबर २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘पिपाणी’ या चित्रपटात चंद्रकांत कुलकर्णी यांना शेवटचा अभिनय करताना पहायला मिळाले होते. त्यानंतर आता ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात अभिनय करणार आहेत.
 
आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, ‘सिनेमा आणि नाट्यसृष्टीत माझी ओळख एक दिग्दर्शक म्हणूनच आहे. ज्यावेळी कोणताही दिग्दर्शक किंवा लेखक एखादा मराठी चित्रपट करत असतो, आणि त्याला एखाद्या भूमिकेविषयी असा ठाम विश्वास वाटतो की ही भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णीच करू शकतात त्याचवेळी मी ती भूमिका करतो. तसच काहीसं ‘मोगरा फुलला’ या चित्रपटच्या बाबतीत झालं आहे. सिनेमाचे लेखक सचिन मोटे यांना असा ठाम विश्वास होता की ही नाट्य दिग्दर्शकाची भूमिका फक्त चंद्रकांत कुलकर्णी साकारू शकतात, म्हणूनच मी हा चित्रपट केला’.
 
चंद्रकांत कुलकर्णी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आहेत. ‘आजचा दिवस माझा’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याआधी त्यांनी १९९४ साली महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग होता.
 
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सई देवधर, नीना कुळकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती,सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
 
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील ‘जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.
 
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती