सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की, अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज असतात. मात्र इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)च्या समोर, उन्हाळ्याच्या सुट्टीत सिनेमा प्रदर्शित करण्यास हिंदीचे निर्माते धजावतात. याच संधीचा फायदा एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना होतो. संपूर्ण कुटुंबासोबत सिनेमा पाहता येण्याजोगी हीच सुट्टी असल्याकारणामुळे, अनेक महिने प्रदर्शनासाठी थांबलेल्या 'करार' या सिनेमाला देखील याच महिन्याचा मुहूर्त लाभला आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित हा सिनेमा २६ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे करारबद्ध झाले आहे.
बिपीन शाह मोशन पिक्चर्स व गौतम मुनोत प्रॉडक्शन्स एल.एल.पी. प्रस्तुत, क्रेक इंटरटेंटमेंटस् प्रा. लि. कृत 'करार' हा सिनेमा प्रेक्षकांना नवा दृष्टीकोन देणारा ठरणार आहे. आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत आढळणार आहेत.
या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत दिग्दर्शक मनोज कोटियन यांनी सांगितले कि, 'करार' हा एक कौटुंबिक सिनेमा असून, या सिनेमाचा विषय लक्षात घेता, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी हा सिनेमा पाहायला हवा, अशी आमची इच्छा होती. मे महिन्याच्या सुट्टीत सगळे कुटुंब एकत्र येत असल्यामुळे, 'करार' सिनेमा याच हंगामात प्रदर्शित करण्याचा आम्ही विचार केला'. तसेच हा सिनेमा पाहिल्यानंतर आजची वर्कहोलिक पिढी आपल्या बीजी शेड्युलमधून थोडावेळ आपल्या कुटुंबासाठी नक्की काढेल, अशी आशा देखील ते व्यक्त करतात.
समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा यात मांडली आहे. आयुष्याला केवळ 'करार' म्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा, आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या यात मांडण्यात आल्या असून, या सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीत दिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे.