राहुल अंजलीची लग्नानंतरची लव्हस्टोरी सांगणार 'तुला कळणार नाही'

मंगळवार, 18 जुलै 2017 (15:54 IST)
बॉलीवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमेंटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र लवकरच मराठीत येत आहे. 'तुला कळणार नाही' या आगामी सिनेमातून त्यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीत रोमेंटिक चित्रपटांचा नवा पायंडा घालणारी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून,  श्रेया कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार ह्या तिकडीने देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती आणि वितरण करणारे जीसिम्ससोबत स्वप्नील जोशी निर्माता म्हणून यापुढील प्रवासात कायम राहणार आहे. तसेच निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. 
 
मराठीतील या राहुल अंजलीच्या भूमिकेत कोण आहे, हे सध्या गुपितच ठेवण्यात आले असले तरी, सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच लॉंच झालेल्या 'तुला कळणार नाही' या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये त्यांचा आवाज ऐकू येतो. शिवाय हे आवाज रसिकांच्या परिचयाचे असल्याकारणामुळे, मराठीतील हे राहुल- अंजली कोण आहेत? याचा अचूक तर्क आतापर्यत सिनेरसिकांनी लावलाच असेल !

वेबदुनिया वर वाचा