‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’, गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गुलकंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहे.
चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ढवळे फॅमिली म्हणजेच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कुटरवर, तर माने फॅमिली म्हणजे ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर शानदार एंट्री घेतली. पुष्पवृष्टीने कलाकारांचे स्वागत करण्यात आले आणि चल जाऊ डेटवर या धमाल गाण्यावर कलाकारांनी थिरकत रंगतदार माहोल निर्माण केला.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि प्रसाद यांच्या एका खास सीनमुळे प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आता ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. पण या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे.
गुलकंद हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ ट्रेलरमध्ये दिसून येतो. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे.
चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं, आणि हाच गोडवा गुलकंद चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे गिव्ह अँड टेक अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “गुलकंद हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, सगळ्यांनी कमाल काम केलं आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल.”