काही सिनेमे इतके धम्माल असतात की, त्याचे चित्रीकरण करताना त्यामधील कलाकारदेखील त्याची पुरेपूर मज्जा लुटत असतात. आणि त्यामुळेच सिनेमालसुद्धा एक वेगळा मिडास टच येतो. असंच काही झालं आहे अक्षय टंकसाळे आणि निखिल वैरागर या दोन कलाकारांच्या बाबतीत, 16 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'गॅटमॅट' सिनेमात प्रमुख भूमिका असलेल्या अक्षय टंकसाळे आणि निखिल वैरागरने अशीच धम्माल मस्ती सेटवर केली आहे. पुण्यात सिम्बोयसीस ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या आवारात या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्या कारणामुळे, या ठिकाणचा मनमुराद आनंद कोणाला घ्यायला आवडणार नाही असंच काहीसं अक्षय आणि निखिल सोबतसुद्धा झालं. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या प्रशस्त युनिव्हर्सिटीमध्ये ही दोघं कुठे न कुठेतरी फिरत असायची त्यामुळे, टीमला सतत त्यांना शोधावं लागायचं. याबद्दल बोलताना 'गॅटमॅट' सिनेमाचे दिग्दर्शक निशीथ श्रीवास्तव सांगतात की, अक्षय आणि निखिलने संपूर्ण युनिव्हर्सिटी पिंजून काढली होती. कारण इथे आम्ही शॉट रेडी करत असताना ही दोघं सेटवरून गायब झालेली दिसायची. कॉलेजच्या मुलांसोबत कधी व्हॉलीबॉल तर कधी फुटबॉल खेळायची, एकदा तर चक्क चालू लॅक्चरमध्ये ही दोघंजण जाऊन बसली होती आणि आम्ही त्यांना शोधण्यासाठी अखंड युनिव्हर्सिटी पालथी घातली होती