'स्माईल प्लीज'चे प्रेरणादायी अँथम सॉन्ग

शुक्रवार, 5 जुलै 2019 (15:47 IST)
तीसहून जास्त कलाकार एकाच गाण्यात 
 
मराठीमधील बहुचर्चित अशा 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचे अँथम सॉन्ग नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'चल पुढे चाल तू' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं प्रेक्षकांसाठी नक्कीच सुखद अनुभव देणारे ठरणार आहे. या गाण्याचे मुख्य वैशिट्य म्हणजे पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीतील तीसहून अधिक नावाजलेले कलाकार या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. हिंदीनंतर मराठी गाण्यात होणारा बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा.
 
'चल पुढे चाल तू वाट ही आपली' असे म्हणत सर्वच कलाकार प्रेक्षकांना जगण्याची एक नवी ऊर्जा देत आहेत. जीवन जगताना सर्वांसमोर रोज एक नवीन आव्हान उभे असते, असे असले तरी आपण आपले जगणे सोडत नाही. कधी आव्हानांवर यशस्वीरित्या मात करून तर कधी अपयशी होऊन आपण जगतच असतो. अशाच आपल्या जगण्याला एक नवीन प्रेरणा, नवीन उमेद देणारे हे गाणे आहे. या गाण्यात उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकर, भूषण प्रधान, चिन्मय मांडलेकर, चिन्मयी सुमीत, रेणुका शहाणे, हर्षदा खानविलकर, शरद केळकर, मेघा धाडे, सिद्धार्थ चांदेकर, मृणाल कुलकर्णी, मृन्मयी गोडबोले, प्रार्थना बेहेरे, प्रिया बापट, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, सचिन पिळगावकर, सई लोकूर, मिताली मयेकर, सागरिका घाटगे, श्रिया पिळगावकर, सोनाली खरे, स्पृहा जोशी, तेजस्विनी पंडित, मानसी नाईक, वैभव तत्ववादी यांच्यासोबतच मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, आदिती गोवित्रीकर, बॉस्को - सिझर, रोहन गोखले, रोहन प्रधान आणि विक्रम फडणीस या सर्व कलाकारांची झलक दिसणार आहे. हे गाणं चित्रित करणे तितकेसे सोपे नव्हते. कारण ह्या गाण्याला एका दिवसातच चित्रित करण्यात येणार होते. विक्रम फडणीस यांनी ह्या गाण्याबद्दलची कल्पना जेव्हा इंडस्ट्रीमधल्या कलाकारांना सांगितली तेव्हा एका झटक्यात सगळ्यांनी होकार दिला. सगळ्या कलाकारांनी होकार तर दिला, पण विक्रम फडणीस यांना सर्व कलाकार एकाच दिवशी त्यांच्या तारखा देतील का? असे वाटत असतानाच शक्य तितक्या सर्व कलाकारांनी उत्तमरित्या सहकार्य केले. हे स्पेशल गाणं चित्रपटाच्या संपूर्ण टीमने जगातील अशा लोकांना समर्पित केले आहे जे लोकं जगण्यासाठी संघर्ष करतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती