महाराष्ट्राचा जयघोष करणारा 'एक आमचा बाणा'

गुरूवार, 4 मे 2017 (10:42 IST)
भारताचे खड्ग हस्त म्हणून नावाजल्या जाणाऱ्या महराष्ट्राचे वैभव खूप मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीचा जितका अभिमान बाळगावा तितका थोडकाच ! महाराष्ट्राच्या याच तांबड्या मातीचा आणि मराठी संस्कृतीचा जयघोष करणारा ''एक आमचा बाणा' हे गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.  १ मे रोजी असणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त हे गाणे संगीतकार आशिष मोरे  यांनी आपल्यासमोर सादर केले आहे. अश्वरथ क्रिएशन  प्रस्तुत ह्या गाण्याचे बोल, संगीत आणि स्वर आशिष मोरे यांचा असून, या गाण्याचे संगीत संयोजन केदार भागवत  यांचे आहे. समीर आडके यांनी दिग्दर्शन केले असून गजानन सुतार यांची सिनेमोटोग्राफी असलेल्या या गाण्यात अस्सल मराठी बाज दिसून येत असून, महराष्ट्राच्या कणाकणात वसलेली जाज्वल्य संस्कृती या गाण्यात पाहायला मिळत आहे. आशिष मोरे यांचे नाव 'काटा किररर्र' या सुप्रसिद्ध गाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. आदर्श शिंदे याच्या आवाजातील या सुपरहिट गाण्याला रसिकांनी चांगलेच पसंत केले असून, 'एक आमचा बाणा' या महाराष्ट्राच्या गौरवगीताला देखील रसिक असाच प्रतिसाद देतील अशी आशा आशिष मोरे यांनी व्यक्त केली आहे.  
विशेष म्हणजे नवीन होतकरू कलाकारांना एकत्र घेऊन या गाण्याचे सादरीकरण आशिष मोरे यांनी केले आहे. तसेच या गाण्यात महाराष्ट्राची कन्या आणि भारताची धावपटू ललिता बाबरची छबी आपल्याला पाहायला मिळणार असून, ह्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वास्तविक जीवनात असणा-या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. 
 
महाराष्ट्राच्या अभिमानापर गायलेल्या अनेक गाण्यांमध्ये आणि गौरवगीतांमध्ये 'एक आमचा बाणा' ह्या गाण्याचा देखील समावेश झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा