अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या एका व्हीडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भारतातील मुलींवर, त्यांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर सोनालीनं भाष्य केलं होतं. या भाष्याचं कुणी समर्थन करतंय, तर कुणी विरोध करतंय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
सोशल मीडियावरून टीका करणाऱ्यांना उद्देशून सोनालीनं एक पत्रक ट्विटरवर शेअर केलंय. यात सोनालीनं म्हटलंय की, “माझा हेतू कुणाला दुखावण्याचा नव्हता, नकळतपणे दुखावला गेला असलात तर दिलगिरी व्यक्त करते.”
जो व्हीडिओ व्हायरल होतोय, त्यात सोनाली म्हणतेय की, “भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन.”
याबाबतीत सोनालीने तिच्या एका मैत्रिणीची किस्सा सांगितला. सोनाली म्हणाली, “तिला 50 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेला मुलगा नकोच, त्याच्याकडे कारही हवी. आणि तो सासू-सासऱ्यांशिवाय एकटा राहात असेल तर उत्तम, अशा तिच्या अपेक्षा होत्या. मी मैत्रिणीला विचारलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे.”