अभिनेता किरण माने प्रकरण, शरद पवार योग्य तो न्याय करतील
सोमवार, 17 जानेवारी 2022 (08:40 IST)
अभिनेता किरण माने यांना मुलगी झाली हो… या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून यावरून उलट- सुलट चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. किरण माने यांनी याप्रकरणी नुकतीच शरद पवार यांची भेट घेल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणावर स्टार प्रवाह वाहिनी आणि मालिकेतील कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार योग्य तो न्याय करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर नुकतंच टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत मुलगी झाली हो… मालिकेतील कलाकारांनी किरण माने प्रकरणावर आपली भूमिका मांडली.
कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आमच्यावर आलेला नाही. अभिनेते किरण माने यांना त्यांच्या गैरवर्तनामुळे मालिकेतून काढण्यात आले, असे स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीने दिले आहे.
गेल्या दोन दिवसापासून अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. यावर आता स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे. तत्पूर्वी राजकीय दबावातून मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप माने यांनी केला होता. परंतु वाहिनीच्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आले. ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप माने यांनी केल्यानंतर शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. मी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे भाजपने वाहिनीवर दबाव आणल्याचा आरोप माने यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.
या प्रकरणाला दोन दिवस उलटून गेले तरी वाहिनीने भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. मात्र मालिकेच्या निर्मात्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता स्टार प्रवाह ने आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांच्यामते माने यांचे वर्तन चांगले नव्हते. त्या त्यांना निर्माता संस्थेने दोन ते तीन वेळा सूचनाही केली होती. त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला.
अभिनेते किरण माने यांना अनेक वेळा पूर्वसूचना देऊनही त्यांनी शोच्या सेटवर मूलभूत शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे सेटवरील महिला नायिकांना त्रास होत असल्याने मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वाहिनीने स्पष्ट केले आहे.