‘मराठी टायगर्स’ सिनेमा बंद पाडण्याची धमकी

शनिवार, 16 जानेवारी 2016 (11:36 IST)
येळ्ळूरमध्ये 25 जुलै 2014 रोजी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. अमोल कोल्हेची प्रमुख भूमिका असलेला ‘मराठी टायगर्स’ फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रासह बेळगावातही प्रदर्शित होत आहे.
 
हे कमी म्हणून की काय पोलीस उपायुक्त अनुपम अगरवाल यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन शहरातील शांततेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये, अशी ताकीदच दिली आहे.
 
सोशल मीडियावर चित्रपटाविषयी चर्चा सुरु आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात पल्रंबित आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कोणतेही मत प्रदर्शन करू नये, तसेच चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून आनंदोत्सव करुन दुसर्‍या बाजूच्या भावना दुखवू नये, असं आवाहनही अनुपम अगरवाल यांनी केलं आहे.
 
मराठी भाषिक गेल्या पाच दशकाहून अधिक काळ आपल्या न्याय्य मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. मराठी भाषिक दरवर्षी कन्नड राज्योत्सव दिनी काळा दिन पाळत आले आहेत. बेळगावात अधिवेशन घेतले जाते त्यावेळी त्याला प्रत्युत्तर म्हणून सीमामेळावा आयोजित केला जातो.

वेबदुनिया वर वाचा