थोडक्यात बचावली 'लालबागची राणी'

गुरूवार, 12 मे 2016 (14:09 IST)
चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी धम्माल, मस्ती तर होतच असते. मात्र काही वेळेस अनैच्छिक प्रसंगही घडतात. पण अभिनयालाच आपले प्राण समजणारे कलाकार 'शो मस्ट गो ऑन' म्हणत पुन्हा आनंदाने कामाला सुरुवात करतात. असचं काहीसं घडलंय लालबागच्या राणीसोबत म्हणजेच वीणा जामकर सोबत. 
 
हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेले सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यात वीणा जामकर याचतु:रस्त्र अभिनेत्रीने  'लालबागची राणी'ची प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष करण्यात आले आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या चित्रिकरणावेळी हातातून उडालेला फुगा पकडण्यासाठी आभाळाकडे पाहत रस्ता ओलांडताना, वेगात येणाऱ्या गाडीच्या धक्क्यापासून वीणाला स्वत:ला वाचवायचं होत. असा हा रिस्की शॉट होता. 
 
ठरल्याप्रमाणे चित्रीकरणाला सुरवात झाली. ते पहायला रस्त्यावर दुतर्फा तुडुंब गर्दी झाली. 'कॅमेरा… अॅण्ड अॅक्शन' म्हणताच संध्याच्या भूमिकेत वीणाने स्वतःला झोकून देत फुगे पकडण्यासाठी आकाशाकडे पाहत निघाली. दुसऱ्या बाजूने गाडीच्या ड्रायव्हरने गाडी सुरु केली. तो वीणापर्यंत पोहोचणार त्या आधीच त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. अभिनयात गुंग झालेल्या वीणाला याची सुतरामही कल्पना नव्हती. वेगात ती गाडी वीणाला ठोकणार इतक्यात गर्दीतील एकाने तिला बाजूला ओढले. काय होतयं  हे कळायच्या आतच 'लालबागची राणी' थोडक्यात बचावली.
काही क्षण वातावरण तंग झाले. कोणी काहीच बोलत नव्हते. मग मात्र वीणा सुखरूप असल्याचे पाहताच सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. त्या व्यक्तीचे कौतुक केले. त्या माणसाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला होता. वीणाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती भीतीने काही काळ थरथरतच होती.
 
साधारण एक तासाने चित्रीकरण पुन्हा सुरु झाले. यावेळी मात्र खुद्द दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर स्वत: गाडी चालवणार होते. वीणानेही आत्मविश्वासाने पुन्हा दमदार अभिनय करण्याचे ठरवले. हा दुसरा टेक निर्विघ्नपणे पार पडला. आपल्या कलाकाराच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन स्वत:च अशी जबाबदारी स्वीकारणारा दिग्दर्शक म्हणून उतेकरांचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. 
 
तेवर, शमिताभ, पा, आयेशा, तेरे नाम, क्यू की यांसारख्या हिंदीतील हिट चित्रपटाची निर्मिती केलेले 'मॅड एंटरटेनमेंट' या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर बॉलीवूडमधील प्रसिध्द नाव म्हणजे बोनी कपूर हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत. हिंदीतील लॉरेंस डीकुन्हा यांचा कॅमेरा व उत्कृष्ट तंत्रज्ञांची टीम तसेच वीणा जामकरसहअशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे अशा दिग्गज कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका पहायला मिळणार आहेत.लक्ष्मण उतेकर यांच्यासारख्या डॅशिंग दिग्दर्शकाचा 'लालबागची राणी' हा सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वेबदुनिया वर वाचा