आयुष्य बदलणाऱ्या 'यारी दोस्ती' चा नवाकोरा सिनेमा

जगात सर्वात श्रेष्ठ कोणते नाते असते ते म्हणजे मैत्रीचे. आई, वडील, भाऊ-बहीण या नात्यांपेक्षा आपण सर्वाधिक वेळ मित्रांसोबतच घालवत असतो. म्हणूनच आपल्या 'दोस्ताचे' आयुष्यात खूप महत्त्व आहे. योग्य वयात मिळालेल्या योग्य मित्रांच्या साथीने आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरणारी मैत्री 'यारी दोस्ती' या नवाकोऱ्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. शांतनु अनंत तांबे लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर आणि टीजर सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले .

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाच्या मोशन पोस्टरवर दिसणारी चार मुलं 'यारी दोस्ती' सिनेमाच्या कथानकाचे प्रतिनिधीत्व करतात. ज्यात दोन शिक्षित, अभ्यासू तर इतर दोन अशिक्षित सडकछाप मुले पाहायला मिळतात. ही चौघे जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा काय काय धम्माल होते ते 'यारी दोस्ती' या सिनेमात अनुभवता येणार आहे. पोस्टरप्रमाणेच या सिनेमाचा टीजर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास पुरेसा ठरत आहे. एकाच नावाच्या दोन व्यक्ती दाखवून गोंधळ आणि तेवढाच दंगा करणारा या सिनेमाचा टीजर सोशल साईटवर धम्माल करत आहे.  

मुंबईसारख्या महानगरात एकीकडे झगमगती दुनिया आहे तर दुसरीकडे अंधारात वावरणार एक वेगळच जग आहे. या दोन्ही जगातल्या माणसांचं जीवन मात्र पराकोटीचे वेगळे आहे. या विभिन्न जगातल्या लोकांचे ध्येयही फार वेगळी आहेत. मात्र जेव्हा ही वेगवेगळी पार्श्वभूमी असलेली किशोरवयीन मुलं एकमेकांच्या आयुष्यात येतात तेव्हा नेमके काय होते? हे 'यारी दोस्ती' या सिनेमात पहायला मिळणार आहे. 

बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित 'यारी दोस्ती' सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे. तर 'माझी शाळा' या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार पदार्पणास सज्ज आहे. शिवाय उर्फी फेम मिताली मयेकर पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे, यात ती एका शाळकरी मुलीच्या भूमिकेत दिसेल. यांच्यासोबतच संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही ठळक भूमिका पहायला मिळणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा