संसदीय समित्यांच्या वर्षभरातील बैठकांमध्ये सरकारने आतापर्यंत कोट्यवधीचा खर्च केला असून, यामुळे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी मात्र जाम वैतागले आहेत. कोणत्याही निष्कर्षाशिवाय पार पडणाऱ्या या बैठकांवर आतापर्यंत साडे नऊ कोटीचा खर्च करण्यात आला आहे.
मंदीच्या काळात खर्चात करण्याचा चांगला पायंडा केंद्रातील काही मंत्र्यांनी घालून दिला आहे. अनेक मंत्र्यांच्या परदेशवारीला लाल कंदील दाखवण्यात आला आहे, तर दस्तूरखुद्द अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे पसंत केले आहे.
अशातच विविध घटना आणि प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 16 संसदीय समित्यांच्या बैठकींवर सरकारने आतापर्यंत साडे नऊ कोटी रुपये खर्च केले आहेत.
मागील तीन वर्षात केवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या समित्यांच्या बैठकीत 64 लाख रुपये उधळण्यात आले. यात 16 लाख रुपये ट्रांस्पोर्टसाठी तर 48 लाख रुपये हॉटेलवर खर्च करण्यात आले आहेत.
असाच खर्च अनेक मंत्रालयातील समित्यांनी केला असून, खर्चात कपात करण्याच्या सूचना करण्यात आल्यावरही खर्च सुरूच असल्याने प्रणव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.