पॅसिव्ह उत्पन्न म्हणजे काय आणि त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते?

बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (18:52 IST)
ब्रिटनमधील लिस्टरशायर येथे राहणारे 38 वर्षीय साजन देवशी सांगतात की, 2020 च्या कोरोना लॉकडाऊन दरम्यान त्यांनी पहिल्यांदाच निष्क्रिय (पॅसिव्ह) उत्पन्नाबद्दल ऐकलं.
 
त्यावेळी, जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात बसलेली होती, तेव्हा देवशी यांच्या लक्षात आलं की बरेच लोक फेसबुक आणि टिकटॉकवर पोस्ट लिहित आहेत ज्याबदल्यात ते अगदी कमी किंवा किरकोळ प्रयत्न करून पैसे कमवतायत.
 
देवशी सांगतात, “अत्यंत कमी कष्ट आणि भांडवलात व्यवसाय सुरू करण्याची आणि मग तो स्वतःच चालवण्याची कल्पना मला आवडली. याचा अर्थ असा होता की, मी माझ्यासाठी महत्त्वाची असलेली सर्व कामं करू शकेन आणि त्याचसोबत चांगलं जगण्यासाठी आवश्यक अतिरिक्त पैसेही कमवू शकेन.
 
या विचाराने देवशी यांनी कार्यालयातून परतल्यावर मुलं झोपी गेल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तज्ज्ञांनी याला 'पॅसिव्ह उत्पन्न' असं नाव दिलंय, म्हणजे अगदी कमी प्रयत्नात कमाई.
 
रांचीचे माजी बँकर आणि आता आर्थिक सल्लागार असलेले मनीष विनोद याबद्दल अधिक विस्तृतपणे सांगताना म्हणतात, "सुरुवातीला तुम्हाला थोडं सक्रीय राहून काही काम किंवा व्यवसाय सुरू करावा लागेल, परंतु काही दिवसांनंतर, तुम्हाला पैसे मिळू लागतात. आणि मग तुम्हाला त्यातून रोज पैसे मिळू लागतील. त्यानंतर तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत, तुमचं काम ऑटो मोडमध्ये सुरू राहतं.”
 
विनोद त्याला संरक्षणाची दुसरी फळी म्हणतात. ते म्हणतात, "तुम्ही स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी तयार केलेल्या संरक्षणाच्या दुसऱ्या फळीला पॅसिव्ह उत्पन्न म्हणतात."
कोरोना लॉकडाऊन
पूर्वी, फक्त श्रीमंत लोकच हे करू शकत होते. कारण त्यांच्याकडे मालमत्ता होती, जी रिअल इस्टेटमध्ये गुंतवून ते त्यातून भाडं मिळवायचे किंवा इतरत्र गुंतवणूक करून त्यातून नफा कमावायचे.
 
पण कोरोना लॉकडाऊननंतर पॅसिव्ह उत्पन्नाची संपूर्ण व्याख्याच बदलली. कारण आता तरुणांनी आणि विशेषत: झेड जनरेशन म्हणवल्या जाणा-या युवा वर्गाने निष्क्रिय उत्पन्न मिळवण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेत.
 
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, नोकऱ्यांचं आव्हान आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे पॅसिव्ह उत्पन्नामध्ये लोकांची रुची वाढतेय.
 
अमेरिकी सेन्सस ब्युरोनुसार, अमेरिकेतील सुमारे 20 टक्के कुटुंबं पॅसिव्ह उत्पन्न कमावतात आणि त्यांचं सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे $4200 आहे. आणि 35 टक्के मिलेनिअल देखील पॅसिव्ह उत्पन्न मिळवतात.
 
भारतातही त्याचा ट्रेंड वाढतोय.
 
मनीष विनोद यांच्या मते, भारतात पॅसिव्ह उत्पन्न मिळवणाऱ्यांची नेमकी संख्या सांगणं कठीण आहे. कारण बरेच लोक ते लपवतात.
 
डेलॉइट ग्लोबल 2022 च्या जेनरेशन झेड आणि मिलेनियल सर्वेनुसार, भारतातील 62 टक्के जनरेशन झेड आणि 51 टक्के मिलेनियल कुठला ना कुठला तरी छोटा जॉब करतात आणि पॅसिव्ह उत्पन्न मिळवतात.
 
कोणतीही अधिकृत आकडेवारी हाती नसली तरी मुंबईस्थित वैयक्तिक वित्त तज्ज्ञ कौस्तुभ जोशी यांनाही असं वाटतं की भारतात हा ट्रेंड वाढतोय.
 
ते म्हणाले, “नवीन पिढीचे तरुण वैयक्तिक अर्थकारणासाठी येतात, तेव्हा पैसे कसे गुंतवायचे हे विचारतातच. त्याशिवाय पॅसिव्ह उत्पन्न कमावण्याचे दुसरे मार्ग आहेत का, हे जाणून घेण्यात त्यांना रस असल्याचं मी पाहिलंय."
 
सोशल मीडियाचा प्रभाव
तुम्हाला टिकटॉक आणि इन्स्टावर असे हजारो व्हिडिओ सापडतील जे तुम्हाला सांगतील की तुम्ही पैसे कसे कमवू शकता.
 
ब्रिटनमधील लीड्स युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलमध्ये शिकवणाऱ्या प्रोफेसर शंखा बसू सांगतात की, अशा व्हिडिओंमुळे तरुणांमध्ये पॅसिव्ह उत्पन्न मिळवण्याची आवड वाढतेय.
 
त्या म्हणतात की, लोक इन्फ्लुएन्सर्सना त्यांच्या यशोगाथा कथन करताना पाहतात आणि त्यांच्यामुळे प्रभावित होतात आणि तेच करायला लागतात. मग त्यातले काही लोक जे यशस्वी होतात ते त्यांची कहाणी सांगतात आणि हे मग चक्र सुरू राहतं.
 
जनरेशन मनीचे संस्थापक आणि पर्सनल फायनान्स तज्ज्ञ अॅलेक्स किंग यांना असं वाटतं की, सोशल मीडियामुळे लोक विश्वास ठेवू लागले आहेत की पॅसिव्ह उत्पन्न मिळवणं शक्य आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचा तो एक सोपा मार्ग आहे.
 
किंग म्हणतात की, आर्थिक परिस्थितीमुळे लोक पॅसिव्ह उत्पन्न कमविण्याचा अधिक विचार करू लागलेत.
 
ते म्हणतात, “गेल्या दशकात लोकांच्या उत्पन्नात कोणतीही वाढ झालेली नाही. अनेक तरुण अत्यंत कठीण परिस्थितीत काम करतात आणि अनेक कंपन्यांचे ओव्हरटाईमबाबतचे नियम अतिशय कठोर आहेत, तुम्ही फक्त काही तास ओव्हरटाइम करू शकता.
 
बसू यांच्या मते, वाढती महागाई आणि वाढत्या दैनंदिन खर्चामुळे, अनेक तरुण आता पॅसिव्ह उत्पन्नाकडे झुकत आहेत. कारण त्यांच्या मते ते मुख्य प्रवाहातील नोकऱ्यामध्ये जास्त तास काम करतात. परंतु त्या तुलनेत त्यांचं उत्पन्न खूपच कमी आहे.
 
कोव्हिडमुळे बर्‍याच लोकांना असं वाटलं की, त्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये अधिक स्वातंत्र्य हवंय आणि या काळात लोकांना पॅसिव्ह उत्पन्नासाठी नवीन तंत्र आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी वेळ आणि संधी दोन्ही मिळालं.
 
किंगच्या म्हणण्यानुसार, नवीन पिढीला असं वाटू लागलंय की सध्याच्या आर्थिक परिस्थितीत तुमच्याकडे उत्पन्नाचा एकापेक्षा जास्त स्रोत असणं आवश्यक आहे.
 
भारतातील पॅसिव्ह उत्पन्न
मनीष विनोद यांच्या म्हणण्यानुसार, भारतात काही लोक खाद्य व्यवसाय करत आहेत तर काही ब्लॉगर झालेत. काही लोकांनी शेअर्सची खरेदी-विक्री सुरू केली आहे तर काही ग्राहकभिमुख स्टोअर्सची (ड्रॉपशिपिंग) काळजी घेतायत.
 
तुमची मालमत्ता भाड्याने देणं हा पैसा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाइन क्लासेसचा कल खूप वाढला होता.
 
त्या काळात इतर नोकरी करणारे, पण शिकवण्याची आवड असलेले बरेच लोक होते. याचा फायदा घेत अशा लोकांनी आपला छंद तर पूर्ण केलाच शिवाय उत्पन्नाचा आणखी एक स्रोतही निर्माण केला.
 
या काळात अनेकांनी पुस्तकं लिहिली आणि नंतर ती प्रकाशित करून पैसे कमावले. मनीष विनोदच्या म्हणण्यानुसार, यूट्यूब चॅनलवर कुकरी क्लासेसच्या माध्यमातून अनेक लोकांनी विशेषतः महिलांनी त्यांच्या छंदाच्या मदतीने भरपूर पैसे कमावलेत.
 
मनीष विनोद सांगतात की, कोरोनाच्या काळात लोकांनी ग्राहकभिमुख स्टोअर्सद्वारेही भरपूर कमाई केली आणि आता ते खूप लोकप्रिय झालंय.
 
ड्रॉपशिपिंग हे एक आधुनिक ऑनलाइन व्यवसाय मॉडेल आहे ज्यासाठी खूप कमी गुंतवणूक आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला जास्त माल खरेदी करून गोदामात ठेवण्याची गरज नाही किंवा तुमचं उत्पादन विकलं जाईल की नाही याची काळजी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही पुरवठादाराकडून वस्तू घेऊन थेट गरजूंपर्यंत पोहचवता.
 
तुम्हाला फक्त ऑनलाइन स्टोअर उघडायचं आहे. तुम्हाला त्या पुरवठादारांशी हातमिळवणी करावी लागेल.
 
तुमच्याकडे कोणतीही मागणी येताच तुम्ही ती वस्तू पुरवठादाराकडून घेता आणि ती वस्तू खरेदीदाराला ऑनलाइन विकता. शेअर्स आणि शेअर्समध्ये ट्रेडिंग हा देखील एक व्यवसाय आहे ज्यातून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.
 
कौस्तुभ जोशी सांगतात, गेल्या 5 वर्षांत मी पाहिलंय की ऑनलाइन पोर्टल, इन्स्टाग्राम, अकाउंट्स, फेसबुक आणि यूट्यूबच्या मदतीने पैसे कमावले जातायत.
 
तुम्हाला जी गोष्ट येते ती व्हिडिओ किंवा मजकुराच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करून तुम्ही पैसे कमवू शकता.
 
हे खरं आहे की यूट्यूब हा बर्‍याच लोकांसाठी कमाईचा प्राथमिक स्त्रोत बनतोय, परंतु बरीच लोकं अजूनही त्याला पॅसिव्ह उत्पन्नाचा स्त्रोत मानतात.
 
इंस्टाग्रामने तरुणांना एक सोपा मार्ग उपलब्ध करून दिलाय, ज्यामध्ये तुमचं इंस्टाग्राम हँडल खूप चांगली कामगिरी करत असेल तर तुम्ही मार्केटिंग कंपनीशी हातमिळवणी करून पैसे देऊन-घेऊन प्रमोशन देखील करू शकता.
 
मार्गातील अडथळे
पण हे देखील तितकंच खरं आहे की काही लोकांना याचा फायदा होतो आणि अनेकांसाठी ते स्वप्नच राहतं. प्रत्यक्षात, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जितक्या सहजपणे सांगतात तितक्या गोष्टी सोप्या नाहीत.
 
देवशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत मदत करण्यासाठी शैक्षणिक संशोधन वेबसाइट सुरू केली. मात्र त्यांनी पूर्वी विचार केला होता तितकं ते सोपं नव्हतं.
 
देवशी सांगतात की, कोणताही प्रकल्प उभारण्यासाठी कठोर परिश्रम आणि वेळ लागतो आणि नंतर पॅसिव्ह उत्पन्न मिळू लागतं. त्यामुळे केवळ पॅसिव्ह उत्पन्न मिळवणं, हे सांगितलं जातं तितकं सोपं नाही.
 
किंग म्हणतात की, अनेक इन्फ्लुएन्सर वाईट हेतूने हे करतात. असे अभ्यासक्रम विकून पैसे मिळू शकतात, असं त्यांना वाटतं. यामुळे त्यांना पैसे मिळतात, पण बघणा-यांचा काहीच फायदा होत नाही.
 
तरीही संधी आहे...
जाणकार सांगतात की काही यशस्वी उदाहरणांकडे याच पद्धतीनं पाहिलं पाहिजे, परंतु असं असूनही याच्या काही संधी उपलब्ध आहेत.
 
जर अधिक लोकांनी पॅसिव्ह उत्पन्न मिळवलं, तर तरुणांसाठी पैसे कमावण्याच्या साधनांमध्ये बदल होईल. बसू म्हणतात की, डिजिटल व्यवसाय बंद करणं फार नुकसानकारक नाही.
 
मानसिकता बदलली आहे आणि हे फक्त श्रीमंतांसाठीच नाहीये. पैशानेच पैसा कमवता येतो ही विचारसरणी बदलतीये.
 
सावधगिरी देखील आवश्यक
पॅसिव्ह उत्पन्नाचा ट्रेंड वाढतोय आणि बरेच लोक त्याचा पुरस्कारही करतात. मात्र याबाबत सावध राहण्याचा सल्लाही कौस्तुभ जोशी देतात.
 
ते म्हणतात, "जेव्हा लोक पैसे कमावण्‍यासाठी पॅसिव्ह उत्पन्नाकडे उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून पाहू लागतात, तेव्हा ते योग्य नाही."
 
मी अनेक लोकांना त्यांच्या कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या पॅसिव्ह उत्पन्नावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करताना पाहिलंय, हे असं करणं चुकीचं आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाच्या दोन्ही स्रोतांवर परिणाम होऊ शकतो.
 
आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत ते म्हणतात, "पॅसिव्ह उत्पन्न मिळवणं ही आजकाल प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु जर तुम्ही तुमचा अधिक वेळ त्यात घालवत असाल आणि स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढू शकत नसाल तर तरुणांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे.
 
पैसे मिळवणं हे तुमचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे, परंतु ते तुमचं अंतिम उद्दिष्ट असता कामा नये.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती