ऑनलाइन व्यवहारांसाठी 'रुपे' कार्डचा वापर

सोमवार, 22 एप्रिल 2019 (16:01 IST)
'नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'तर्फे (एनपीसीआय) कार्यान्वित 'रुपे' कार्डचा ऑनलाइन व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले आहे. देशातील डिजिटल पेमेंट बाजारपेठेसाठी हा शुभसंकेत असून यापूर्वी 'रुपे' कार्डचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागांतच होत असल्याचे दिसून आले होते. मात्र, आता महानगरांमध्येही या कार्डचा वापर वाढल्याचे दिसून आले आहे. 'एनपीसीआय'च्या तपशीलानुसार मार्च 2019मध्ये 'रुपे' कार्डच्या माध्यमातून देशात5.4 कोटी व्यवहार झाले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 'रुपे'च्या माध्यमातून 2.5 कोटी व्यवहार झाले होते.
 
'रुपे' कार्डचा वापर 'ई-कॉमर्स'मध्येही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, 'पॉइंट ऑफ सेल्स'वर (पीओएस) झालेल्या स्वाइपची संख्या मार्च 2019 मध्ये घटून 5.6 कोटींवर आली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये साडेसात कोटींहून अधिक स्वाइपची नोंद करण्यात आली होती. पेमेंट गेट वे 'रेझरपे'ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत त्यांच्या प्लॅटफार्मवरून 'रुपे' कार्डच्या व्यवहारांमध्ये 350 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या शिवाय 'रुपे' कार्डचा अवलंब करणार्‍या व्यापार्‍यांच्या संख्येतही 46 टक्के वाढ झाली आहे.
 
आमच्या प्लॅटफॉर्मवर रुपे कार्डचा वापर वाढण्याचे श्रेय प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकेला जाते, अशी माहिती 'रेझरपे'चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथूर यांनी दिली. याचाच अर्थ 'रुपे' कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर करणार्‍या सार्वजनिक कंपन्यांचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी करत आहेत. त्यामुळे डिजिटलअर्थव्यवस्थेला बळकटीच मिळाली आहे. एका पेमेंट कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार 'ई-कॉमर्स' कंपन्या आता महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ शोधत आहेत. हा कल कॅश ऑन डिलिव्हरीकडून कार्डद्वारे करण्यात येणार्‍या पेंटकडे वळत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती