Jio करणार आहे मोठा धमाका, फक्त एवढ्या रुपयांमध्ये 5 जी स्मार्टफोन बाजारात आणत आहे

सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:46 IST)
Jioच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात आणि जिओ फायबरच्या माध्यमातून ब्रॉडबँड क्षेत्रात मोठा धमाका केल्यानंतर आता रिलायन्सनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्सच्या जिओमुळे इंटरनेटचे दर खाली आले. जिओशी स्पर्धा करण्यासाठी इतर कंपन्यांनाही दर कमी करावे लागले. याचा मोठा फायदा ग्राहकांना झाला. जिओच्या माध्यमातून भारतीयांना स्वस्तात ४जी इंटरनेट उपलब्ध करून दिल्यानंतर आता रिलायन्सनं ५ जीची तयारी सुरू केली आहे. रिलायन्सनं ४ जीची सुविधा असलेले अतिशय किफायतशीर फोन बाजारात आणले. तशीच तयारी त्यांनी ५ जीसाठी सुरू केली आहे. रिलायन्सच्या ५ जी फोनची किंमत ५ हजारांपेक्षा कमी असेल. रिलायन्स जिओ यामध्ये यशस्वी झाल्यास टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजेल. ५ जी फोनची किंमत सुरुवातीला ५ हजार रुपये असेल.
 
त्यानंतर मागणी आणि विक्री लक्षात घेऊन ती २,५०० किंवा ३,००० रुपयांपर्यंत आणली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. २० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवून कंपनी ५ जी स्मार्टफोनच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या २ जी फोन वापरणाऱ्या ग्राहकांना ५ जी सुविधा उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य रिलायन्सनं ठेवलं आहे. त्यामुळेच त्यांना स्वस्तात ५ जी स्मार्टफोन्स देण्याची तयारी रिलायन्स जिओनं केली आहे. सध्याच्या घडीला देशात ५ जी स्मार्टफोन्सची किंमत अतिशय जास्त आहे. भारतात अद्याप ५ जी नेटवर्क सुरू झालेलं नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातली अमेरिकन कंपनी रिलायन्ससोबत स्वस्त एँड्रॉईड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करेल, असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींनी ४३ व्या सर्वसाधारण सभेत म्हटलं होतं. मुकेश अंबानींनी केलेली घोषणा पाहता रिलायन्स ५ जी स्मार्टफोन्सच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी मायक्रोसॉफ्टची मदत घेईल, असं मानलं जात आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती