काय रिलायन्स ‘टिकटॉक’ची खरेदी करेल?
भारत-चीन सीमेवरील तणावानंतर भारतानं चीनच्या 59 ऍप्सवर बंदी घातली आहे. या बंदीमुळं चिनी कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यातही टिकटॉकवरील बंदीचा खूप मोठा फटका त्या कंपनीला बसला आहे. त्यामुळे या ना त्या मार्गाने भारतीय बाजारपेठेत पुन्हा घुसण्याची तयारी टिकटॉक करत आहे.
मायक्रोसॉफ्टशी डील फिस्कटली
टीकटॉकची अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत चर्चा सुरू होती. पण, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी कंपन्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळं टिकटॉक-मायक्रोसॉफ्ट डील फिस्कटली. मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचे 30 टक्के शेअर्स विकत घेण्याच्या तयारीत होती. पण, ट्रम्प यांनी अमेरिकनं कंपन्यांना संपूर्ण कंपनी विकत घेण्याची अट घातली आहे. त्यासाठी अमेरिकन कंपन्यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतही देण्यात आलीय. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता टिकटॉक-मायक्रोसॉफ्ट यांच्यात व्यवहार होण्याची शक्यता धूसर असल्याचं बोललं जातयं.
रिलायन्सकडून प्रतिक्रिया नाही!
मायक्रोसॉफ्टशी व्यवहार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर टिकटॉकने भारतातील कंपन्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. टिकटॉकला भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर बिझनेस मिळत होता. त्यामुळं किमान भारतातील बिझनेस एखाद्या भारतीय कंपनीला विकण्याचा टिकटॉकचा प्रयत्न आहे. त्यात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडिया लिमिटेडला (RIL)टिकटॉकच्या खरेदीसाठी गळ घातली जात असल्याची चर्चा आहे. या संदर्भात टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात त्यांनी केवळ भारतातील बिझनेस खरेदी करण्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी एकमेकांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, सूत्रांनी ही माहिती दिली असली तरी, रिलायन्स कंपनीकडून याबाबत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही.