देशातील चारचाकी गाड्या बनवणारी जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने पिक अप ट्रक इम्पिरीओच्या 300 गाड्या परत मागवल्या आहेत. ट्रकमधील खराब रिअर अॅक्सल बदलण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या आदेशात स्पष्ट केले की, एप्रिल व जून, 2018 दरम्यान उत्पादित इम्पिरीओ वाहनांच्या रिअर अॅक्सेलची तपासणी करणार आहे. या तपासणीनंतर जर रिअर अॅक्सेलला दुरुस्त करायची गरज असेल तर कंपनी मोफत ते करुन देणार आहे. कंपनीच्या नुसार ते स्वतः ग्राहकांशी संपर्क करत आहेत. कंपनी किती ट्रक परत मागवणार आहे याचे स्पष्टीकरण कंपनीने अद्याप दिलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी 300 ट्रक परत मागवू शकते असे चित्र आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने घेतलेला हा निर्णय वाहन रिकॉल करणे म्हणजेच परत मागवण्याच्या एसआयएएमच्या नियमांतर्गत असून, कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन ग्राहक त्यांच्या वाहनाला सर्व्हिसिंगची गरज आहे की नाही याची माहिती घेऊ शकतात. महिंद्रा नेहमीच ग्राहकांची काळजी घेतांना दिसत असून त्यामुळे कंपनीच्या प्रतिमेस असे साजेसे काम होणार आहे.