काही दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात अंड्याचे भाव वाढले आहेत. ट्रान्सपोटेशन, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असून दुसरीकडे मालाची देखील कमतरता होत आहे. त्यामुळे अंड्यांचे भाव वाढले आहेत, असे होलसेलर व्यापारी आणि दुकानदार सांगत आहेत.
लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींचे उद्योग धंदे बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत महागईने तोंड वर काढले आहे. कांदा-बटाट्यानंतर आता अंड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. एका अंड्यामागे 1 रुपये प्रति भाव वाढले आहेत.
या आधी 1 डझन अंड्यांची किंमत 60 रुपये डझन होती. तीच अंडी आता 70 रुपये डझनने विकली जात आहे. तसेच शेकडा 100 नग 450 रुपये होते तेच आता 550 रुपय शेकडा 100 नग झाले आहे.
दुसरीकडे गावठी अंड्यांचे दर 150 डझन असून यामध्ये वाढ झालेली नसल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. अशीच अंड्यांची कमतरता जाणवली तर अजून भाव वाढण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली आहे.