साखरेच्या दरात वाढ, सणासुदीत महागाई

सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (08:00 IST)
Increase in sugar prices inflation during festivals आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र झाला आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, महागाईमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, साखरेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अन्न पदार्थांच्या किमतीत वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती गेल्या १३ वर्षातील सर्वोच्च आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारावरही दबाव येत आहे.
 
फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या ताज्या अहवालानुसार जागतिक बाजारात साखरेच्या किमती सप्टेंबर महिन्यात उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्या साखरेला जवळपास १३ वर्षांतील उच्चांकी दर मिळाला आहे. जागतिक स्तरावर साखरेच्या किमती वाढवण्यात भारताचाही हातभार आहे. एल निनोमुळे भारत आणि थायलंडमधील ऊस पिकांवर परिणाम झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम साखरेच्या दरावर दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कृषी एजन्सीने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात एकूणच अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. मात्र, इतरांपेक्षा साखरेचे दर वाढले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात साखर किंमत निर्देशांक ९.८ टक्क्यांनी वाढला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती