HDFC बँक बुडणार, पासबुकवर DICGC चा स्टॅम्प, जाणून घ्या सत्य

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (15:47 IST)
मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल्या बँकेबाबत चिंता व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच एचडीएफसी बँकेच्या पासबुकचा एक फोटो व्हायरल झाला. त्यावर असलेल्या स्टॅम्पमुळे अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यामध्ये बँक बुडणार का ? असे देखील अनेक प्रश्न उभे राहिले आणि सोशल मीडियामुळे ही चर्चा जोरात सुरु झाली. 
 
एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. व्हायरल होणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या पासबुकवर डिपॉझिट विम्याबाबत स्पष्टीकरण करणारा स्टॅम्प आहे. त्यामुळेच बँकांच्या अनेक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिझर्व्ह बँकने २२ जुलै २०१७ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्याचे पालन सर्वच बँका करत आहेत. त्यामुळे हे नवीन परिपत्रक नसून DICGC चे नियम सर्वच बँकांना लागू होत असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.
 
स्टॅम्पवर नेमक काय लिहीले आहे?
एचडीएफसी बँकेच्या पासबुकवर असलेल्या स्टॅम्पमध्ये ग्राहकांनी जमा केलेले पैसे हे DICGC च्या विम्यानुसार आहेत. जर, बँक दिवाळखोरीत निघाली तर DICGC ही ग्राहकांना पैसे देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांनी दावा केल्यानंतरच्या दोन महिन्यात त्यांना फक्त एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल.
 
बँकेचे म्हणणे काय?
DICGC च्या विम्याबाबतची माहिती पासबुकवरील पहिल्या पानावर देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. हे निर्देश सर्व व्यावसायिक बँका, छोट्या पतपुरवठादार बँका आणि पेमेंट बँकांना देण्यात आल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी 9 बँका बंद होणार असं वृत्त व्हायरल झालं होतं. मात्र त्यानंतर रिझर्व्ह बँकेनेच याबाबत माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, सेंट्रल बँक, युनायटेड बँक, कॉर्पोरेशन बँक, युको बँक, आयडीबीआय, आंध्र बँक व इंडियन ओव्हरसीज बँक बंद करण्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनी काही बँका बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त खोडसाळ असल्याचे म्हटले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती