मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात घट दिसून आली आहे. ऑगस्टमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. जुलै महिन्यातील 1.49 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हा आकडा कमी राहिला आहे. परंतु वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात वाढ दिसून आली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये 1.12 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले होते. एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
ऑगस्टमध्ये सीजीएसटी संकलन 24,710 कोटी रुपये राहिले आहे. तर एसजीएसटीचा आकडा 30,951 कोटी रुपये आणि आयजीएसटीचा आकडा 77,782 कोटी रुपये इतका राहिला आहे. याचबरोबर आयातीवर आकारण्यात आलेल्या जीएसटीचाही यात समावेश आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात सीजीएसटी संकलनाचे प्रमाण 25,751 कोटी रुपये, एसजीएसटी 32,807 कोटी रुपये तर आयजीएसटीचे प्रमाण 78,518 कोटी रुपये इतके राहिले होते. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले होते. 1.5 लाख कोटींचा आकडा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती.
जीएसटी संकलनात राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. महाराष्ट्रात जीएसटी संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढून 22,129 कोटी रुपये राहिले आहे. या यादीत कर्नाटक 9,795 कोटी रुपयांच्या संकलनासह दुसऱया तर गुजरात 9,183 कोटी रुपयांच्या संकलनासह तिसऱया स्थानावर राहिला आहे.
जीएसटी संकलन 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिल्याचा ऑगस्ट हा सलग सहावा महिना ठरला असल्याचे अर्थ मंत्रालयाने नमूद केले आहे. आर्थिक गाडा रुळावर परतल्याने जीएसटी संकलनावर सातत्याने सकारात्मक प्रभाव पडत आहे. मागील काही महिन्यांमध्ये जीएसटी परिषदेने अनेक निर्णय घेतले असून त्याचाही प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे.