कोविड काळात अन्नासाठी दाहीदिशा फिरणाऱ्या जनतेसाठी केंद्र सरकारने दिलेली तुरडाळ नागरी पुरवठा खात्याने गलथान कारभारामुळे कुजवून टाकली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून या खात्यामार्फत जनतेला वितरीत करण्यासाठी मोदी सरकारने दिलेली 10. 310 मॅट्रिक टन साखर वितळून गेल्याचा आणखी धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे. या खात्याच्या तत्कालीन संचालकाने खात्यात घातलेला गोंधळ आता उघड झाला असून मुख्यमंत्री आता नेमकी कोणती कारवाई करतात हे आता पहावे लागेल.
प्राप्त माहितीनुसार, अत्यंत महागडी अशी तुरडाळ सरकरच्या नागरी पुरवठा खात्याच्या गोदामामध्ये सडून गेल्याने सरकारला सुमारे अडीच कोटी रुपयांचा फटका बसला आहे, शिवाय ज्या शेतकऱयांनी ही डाळ तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि घाम गाळले ते वाया गेले. शिवाय गरीबाचा घासही गेला. यामुळे जनतेत प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. नागरी पुरवठा खात्याने या डाळीची विल्हेवाट लावण्यासाठी आता निविदा काढल्या आहेत. अशा पद्धतीची नामुष्की गोवा सरकारवर पहिल्यांदाच आली आहे.