1 डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार फास्टॅग

शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (11:44 IST)
देशभरातील सर्व टोल एक डिसेंबरपासून कॅशलेस होणार आहे. देशभरात १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय. जर आपण फास्टॅग खरेदी केले नसेल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागरिकांच्या सुविधेसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत फास्टॅग देणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील देशभरातल्या सर्व ५३७ टोल नाक्यांवर तसंच महामार्गांलगत असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये हा फास्टॅग मोफत देण्याची प्राधिकरणाची योजना आहे. 
 
ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या कार्यालयांमध्येही हे फास्टॅग मोफत देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत फास्टॅगसाठी नागरिकांना केवायसी भरण्याची आवश्यता नाही. हे फास्टॅग ट्रक, कार, जीपसह सर्व वाहनांसाठी १ डिसेंबरपर्यंत मोफत देण्यात येतील. पण बँका आणि संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या फास्टॅगसाठी केवायसी भरावा लागणार आहे. तसं फास्टॅग विकताना 150 रुपये सिक्योरिटी डिपॉटिज घेतलं जातं परंतू सध्या ही सुविधा मोफत करण्यात आली आहे.
 
जाणून घ्या फास्टॅग सुविधेबद्दल
फास्टॅग गाडीच्या पुढच्या काचेवर बाजूला लावण्यात येत असून वेळोवेळी रिचार्ज करावा लागतो. या फास्टॅगमुळे गाडीला टोल नाक्यावर थांबण्याची गरज पडत नाही. कॅमेऱ्याद्वारे हा फास्टॅग स्कॅन होऊन त्यातील टोलचे पैसे कापले जातात.
 
येथे मिळेल फास्टॅग
आरटीओ कार्यालय, ऑनलाईन शॉपिंग साइटवर, माय फास्टॅग अॅप (MYFASTag App)वरून तसेच अॅपद्वारे फास्टॅग ऑनलाइन रिचार्जही करता येतो. देशात अनेक केंद्रांद्वारे फास्टॅगची विक्री करण्यात येतेय तसेच बँकांना फास्टॅग सुविधेशी जोडण्यात आलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती