आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ

सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार कार्ड लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ होती. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. महाधिवक्ता के. के. वेणुगोपालन यांनी सरकारच्यावतीने ही माहिती न्यायालयाला दिली. ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही, त्यांच्यापुढे अडचण निर्माण होईल, असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, अशी हमीदेखील सरकारकडून देण्यात आली.
 
केंद्र सरकारने विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची जोडणी अनिवार्य केली आहे. मात्र देशात आधार कार्ड नसलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. सरकारच्या आधार सक्तीमुळे अशा लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. अखेर याबद्दल स्पष्टीकरण देताना महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडली. आधार कार्डची सक्ती न करता ३१ मार्चपर्यंत समाज कल्याण योजनेचा लाभ लोकांना देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. याआधी केंद्र सरकारकडून विविध योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१७ होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती