क्रेडिट सोसायट्यांचे रुपांतर बँकेत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली ही ग्वाही

मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (07:28 IST)
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची या क्षेत्रातील कामगिरी अभिमानास्पद असून सर्वसामान्य माणसाला उभं करणाऱ्या अशा संस्थांचे बँकेत रुपांतर व्हावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. तसेच यासंदर्भात केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
 
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयास त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री आमदार संजय राठोड, खासदार हेमंत पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर घुगे, गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, यांची उपस्थिती होती.
 
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, लोककल्याणासाठी एखादी संस्था चालवणे आणि त्यात सातत्य टिकवून ठेवणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र गोदावरी अर्बन संस्थेने अवघ्या दहा वर्षात पाच राज्यात विस्तार केला आहे. तो अतिशय अभिमानास्पद असाच आहे. त्यामुळे गोदावरी अर्बन सोसायटी ही पतसंस्था न राहता तिचे बँकेत रूपांतर झाले पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करु असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयात ‘घ्या उंच भरारी तुमच्यासोबत गोदावरी’ ही गोदावरी अर्बनच्या कार्याचा आढावा घेणारी 15 मिनिटांची चित्रफित मुख्यमंत्र्यांनी पाहिली. पाच राज्यात विस्तार, 85 शाखा ही संस्थेची कौतुकास्पद कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
नांदेड महानगराच्या विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर पूर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषि बाजारपेठ व इतर कृषि क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पूर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. नांदेडला जोडणाऱ्या पूर्णा, हिंगोली रस्त्यांसाठी 192 कोटींच्या निधीतून या भागातील वाहतूक सुलभतेसाठी मोठी सुविधा निर्माण होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
नांदेड महापालिकेअंतर्गत शहरातील उत्तर मतदारसंघातील मूलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. येथील भक्ती लॉन्स येथे झालेल्या या प्रातिनिधीक भूमिपूजन समारंभास खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
पासदगावजवळील पूल हा दरवर्षी पुराच्या पाण्याने वेढला जातो. पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने ते ओसरेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक खोळंबून राहते. सध्या आहे त्या पुलाऐवजी नवीन पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी धोरणाअंतर्गत परभणी जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या पोखर्णी (परभणी)-बोरवड-लिंबाळा-ताडकळस-पूर्णा ते नांदेड या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता नांदेड जिल्हा सीमेपर्यंत आहे. मात्र या सीमेपासून नांदेड शहरापर्यंत रस्ता अधिक चांगला होणे बाकी होते. याचीही सुधारणा करणे व हायब्रिड ॲन्युइटीच्या धर्तीवर हा उरलेला मार्गही पूर्ण करणे आवश्यक होते. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या उमरा-सोडेगाव-बोल्डा-कुरुंदा-वसमत ते नांदेड हा जिल्हा सीमा रस्ता प्रगतीपथावर आहे. याही रस्त्याचे काम नांदेडच्या जिल्हा सीमेपर्यंत मर्यादित होते. नांदेड शहर याला चांगल्या मार्गाने जोडल्या न गेल्यामुळे या वाहतुकीला मोठा आडथळा निर्माण झाला होता. याची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक होते. या तीनही कामांमुळे वाहतूक सुविधेत मोठी सुलभता आता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती