तिकीट विक्रीतून वर्षभरात 20 हजार कोटींचा गल्ला

मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (10:16 IST)
रेल्वेने आपल्या IRCTC च्या वेबसाइटद्वारे यंदा तगडी कमाई केली आहे. प्रवाशांनी IRCTC वेबसाइटवरून बुक केलेल्या तिकिटांमुळे, रेल्वेने तब्बल 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचा महसूल जमवला आहे. IRCTC च्या कमाईचा हा मार्च 2015 पर्यंतचा आकडा आहे.
 
मार्च 2015 अखेर IRCTC ने तिकीट विक्रीद्वारे तब्बल 20 हजार 620 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘फ्लिपकार्ट’च्या कमाईपेक्षाही दुप्पट आहे.
 
IRCTC ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 34 टक्के अधिक गल्ला जमवला आहे. IRCTC ला तिकीटविक्रीतून गेल्या वर्षी मार्चअखेर 15 हजार 410 रुपये मिळाले होते. IRCTC ने प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करताना अडचणी येऊ नयेत, म्हणून अद्ययावत यंत्रणा सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी IRCTC च्या वेबसाइटवर प्रत्येक मिनिटाला 2 हजार तिकीट बुक करता येत होते. मात्र ही प्रणाली यंदा अद्ययावत केल्यामुळे आता प्रती मिनिटाला तब्बल 7 हजार प्रवासी तिकीट बुक करू शकतात. यामुळेच IRCTC ने मोठ्या प्रमाणात तिकीट विक्रीतून गल्ला जमवल्याचं दिसून येत आहे.

वेबदुनिया वर वाचा