अहं मुर्खास्मि (एप्रिल फूल विशेष)

WD
जग हा वेड्यांचा पसारा असे कुणीतरी म्हटलेय, म्हणे. पण माझ्या मते जग हा मुर्खांचा पसारा असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझ्या या विधानाने बरेच लोक नाराज होतील, याची मला कल्पना आहे. पण मी मांडलेले स्पष्टीकरण वाचल्यानंतर ते किती योग्य आहे, हेही तुम्हाला पटेल. आणि स्वतःला मुर्ख म्हणवून घेण्याचा तुम्हालाही आनंदच वाटेल.

वास्तविक समर्थ रामदासांनी 'मुर्खांची लक्षणे' सांगितली, असली तरी त्यात बरीच कमतरता आहे. आम्ही शोधून काढलेली लक्षणे आणि त्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्हीही नक्की आमचे 'दास' होऊन आमचा 'बोध' मान्य कराल याची खात्री आहे.

वस्तुतः जगात आपण किती शहाणे आहोत, हे सांगण्याची जणू स्पर्धा चाललेली आहे. पण मी किती मुर्ख आहे, हे कधीही कोणीही सांगत नाही. याचे कारण अगदी सोपे आहे. कितीही शहाणे असलो तरी आपला मुर्खपणा सिद्ध करण्याची जबाबदारी आपली नसते. त्यासाठी जागोजागी लोक टपलेले असतात.

आता हेच घ्या ना. घरात आपल्याला खाली दाखविण्याची एकही संधी बायको सोडत नाही. 'तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही म्हणजे अगदी 'हे' आहात, हे सांगणार्‍या बायकोला 'हे' चा आणि 'हे' असणार्‍या नवर्‍याला त्या 'हे'चा अर्थ चांगलाच माहित असतो. आता घरात आईच बाबांना मुर्खात काढते हे 'याची डोळीयाने' पाहिल्यावर कुलदीपक आणि कुलदीपिका ही संधी कशी बरे सोडतील? वेळ आल्यावर 'बाबा तुम्हाला ना काही कळत नाही' हे वाक्य आईच्याच चालीवर आपल्या दिशेने फेकून आपण किती मुर्ख आहोत, हे 'तो' शब्द न वापरता ते बरोब्बर सांगतात.

पण घरात असा मुर्खपणा पांघरून घेण्यातही आपलीच सोय आहे, हे कधी तुमच्या लक्षात आलेय? आपल्याला हे कळत नाही, या बाबतीत आपल्याला माहित नाही, किंवा त्याचे काय करायचे असे असे म्हटल्यावर त्यासंदर्भातली आपली जबाबदारीही तिथेच संपते. कारण आपलं 'अर्ध अंग' आपण असे म्हटल्याक्षणी 'पूर्णांग' होऊन आपली जबाबदारी आपल्यावर ओढवून घेते. सहाजिकच त्याविषयाचा जास्त विचार करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आपल्याला बाजूला काढून बाकीचे लोक ती बाजू भरून काढतात. शेवटी काय 'मुर्ख' बनून रहाण्यात फायदा आपलाच असतो.

हे घरचे. बाहेरही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. ऑफिसात काही महत्त्वाचं काम असेल तर साहेब आपल्याबरोबरच्या हुशार सहकार्‍याला बोलवतो आणि त्याला ते देतो. त्यानं कुरकुर केली, की साहेब त्याला काही कळत नाही. तूच हे करू शकतो.' असं आपलं नाव घेऊन सांगतो. थोडक्यात आपल्याला मुर्ख ठरविण्याचा कार्यक्रम इथेही सुरू असतो. पण मला सांगा आपल्या मुर्खपणामुळे आपल्यावर येऊन पाहणार्‍या संभाव्या कामाच्या जबाबदारीतून आपली सुटका होत असेल तर मुर्ख रहाण्याचा फायदा आहे की नाही?

समजा साहेबाने आपल्याला काम सोपवलेच तर ते टाळण्याची आणखी एक युक्ती तुम्हाला सांगतो. साहेबाने सोपविलेल्या कामातले आपल्याला फार कळते असे कधीही चुकूनही दाखवून देऊ नका. आपल्याला काहीच कळत नाही, असे सोंग घ्या आणि चेहर्‍यावर त्या सोंगावर छानपैकी थोडा बावळटपणा शिंपडा. तेच मुखमंडल घेऊन साहेबाकडे जा. आता थोडी निर्भत्सना सहन करण्याची तयारी ठेवा. कारण, असे म्हणतात, की मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावी लागते. साहेब, तुम्हाला म्हणेल, 'काय हो एवढं साधं तुम्हाला कळत नाही?'

ते समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला, तरी चेहर्‍यावरचे बावळटपणाचे भाव केसावरच्या तेलासारखे ढळू देऊ नका. ते तसेच ठेवा. म्हणजे तुमच्या बावळटपणावर शिक्कामोर्तब होईल. आणि मग हताश झालेला साहेब तुमच्याच एखाद्या सहकार्‍याला बोलावून ते काम त्याच्याकडे सोपवेल. थोडक्यात थोड्याशा बावळटपणामुळे तुमच्यावरचा कामाचा ताण किती कमी होईल? जरा कल्पना करा.

मी असा मुर्खपणा अनेकदा दाखवतो. बाजारात गेलो की खरेदी करताना आपण अगदी बावळट आहोत, आपल्याला काही कळत नाही, असा चेहरा करतो. दुकानदाराने एखादी वस्तू दाखवली की थेट त्याच्या निम्मी किंमत सांगतो. तो माझ्याकडे 'काय मुर्ख माणूस आहे हा, असा चेहरा करून बघतो. मी मात्र माझा चेहरा कायम ठेवतो आणि तिथेच चिकटून बसतो. दुकानदार मला सुरवातीच्या काळात किंमत पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण मी ते पटत नसल्याचे दाखवतो. नंतर तो हरतर्‍हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्‍याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्‍याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे.

थोडक्यात रोजच्या जगण्यात मला माझ्या शहाणपणापेक्षा मुर्खपणा जास्त फायदेशीर ठरतो. मी मुर्ख असल्याचे दाखविणे, भासविणे आणि ठसविणे हेच अंतिमतः माझ्या फायद्याचे असते. शेवटी मुर्खपणापेक्षा फायदा महत्त्वाचा. आणि कुण्या एरिस्टॉटलने का कुणीतरी म्हणूनच ठेवलेय ना 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. शहाणे ठरण्यासाठी तरी आपल्यात मुर्खपणा हवाच नाही का?

वेबदुनिया वर वाचा