हिंदू धर्मात मृत्यूनंतर स्वर्ग अथवा नरकात जावे लागते ही संकल्पना आहे. हिमाचलमधल्या या यममंदिरात प्रत्येक व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतर आणला जातो असा समज आहे. हे मंदिर एखाद्या घरासारखेच दिसते. धर्मराज मंदिर असेही याला म्हणतात. धर्मराज हे यमराजाचेच नाव आहे. या घरातील एक खोली चित्रगुप्ताची आहे. चित्रगुप्त प्रत्येक व्यक्तीच्या पापपुण्याचा काटेखोर हिशोब लिहिणारा यमराजांचा सचिव मानला गेला आहे. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीचा आत्मा या मंदिरात चित्रगुप्ताच खोलीत आणला जातो. तेथे चित्रगुप्त त्याच्या पापपुण्याचा हिशोब वाचून दाखवितात व त्यानंतर हा आत्मा आतल्या खोलीत यमाच्या दरबारात येतो. येथे यम त्याच्या पापपुण्याचा आढावा घेतो व त्याची रवानगी कुठे करायची याचा फैसला होतो. त्यानुसार नरक अथवा स्वर्गात प्रवेश मिळतो अशी कल्पना आहे. या मंदिराला चार गुप्त दारे असल्याचाही समज आहे.
गरूड पुराणात यम दरबाराला असलेल्या चार दारांचा उल्लेख आहेच. ही दारे सोने, चांदी, तांबे व लोखंडाची आहेत. मृत व्यक्तीच्या पापपुण्यानुसार त्याला कुठल्या दारातून आत पाठवायचे याचा निर्णय केला जातो असे मानले जाते. जगातील हे एकमेव यमराज मंदिर असल्याचे सांगितले जाते, मात्र ते खरे नाही. कारण मथुरेत यम यमुना यांचे मंदिर आहे व त्याला बहीण भाऊ मंदिर म्हटले जाते.