मंगळवार, 7 जानेवारी 2025 (12:05 IST)
शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली
दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली
येतां भक्ता संकट धावुनी ही आली
दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥
जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते
अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥
मधुकैटभ, महिषासुर मातले फार
दुर्गारूपाने केलास दानव संहार
शक्ती तुझी महिमा आहे अपार
म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥
अवर्षणाने जग हे झाले हैराण
अन्नपाण्याविना झाले दारूण
शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न
खाऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥
चंडमुंडादिक भैरव उद्धरिले
भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले
नृपपद्माचे त्वा वंश वाढविले
अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥
पाहुनी माते तुजला मन होते शांत
मी पण् उरे न काही मानव हृदयात
प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात
ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥
वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी
आलो शरण तुला मी आशिष दे मजसी
अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी
अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥
*****************************************
मराठी आरती संग्रह
जय देवी जय देवी जय शाकंभरी ।
श्रीवनशंकरी माये आदि विश्वंभरी ।।ध्रु.।।
दैत्यें सुरजन गांजित पडला दुष्काळ ।
देखुनि दानव वधिसी सक्रोधें प्रबळ ।
शाखा वटुनि पाळिसी विश्वप्रिय सकळ ।
भक्ता संकटी पावसी जननी तात्काळ ।।१।।
सद्भक्ति देवी तू सुरसर्वेश्वरी ।
साठी शाखा तुज प्रिय षििड्रध सांभारी ।
तिळवे तंबिट कर्मठ द्वादश कोशिंबीरीं ।
पापड सांडगे वाढिती हलवा परोपरी ।।२।।
अंबे कर्दळि द्राक्षे नाना फळे जाण ।
दधि घृत पय शर्करा लोणची नववर्ण ।
कथिका चाकवत चुक्का मधुपूर्ण ।
वाढिती पंचामृत आले लिंबू लवण ।।३।।
बर्बूरे कडी वडे वडिया वरान्न ।
सुंगध केशरी अन्न विचित्र चिन्नान्न ।
भक्ष्यभोज्य प्रियकर नाना पक्कान्न ।
सुरार रायति वाढिती षड्रस परमान्न ।।४।।
पोळी सुगरे भरीत आणि वांगीभात ।
पात्रीं वाढिती सर्वही अपूप नवनीत ।
जीवन घेता भोजनी प्रसन्न भक्तातें ।
प्रार्थुनि तांबूल देऊनि वंदी गुरुभक्त ।।५।।