मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (06:28 IST)
तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।
अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥
तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।
त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥
मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा ।
पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥
आले यमकिंकर म्हणती रविकुमरा ।
तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय. ॥ २ ॥
तुझिया एका दळे सोडविले देव ।
म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥
वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव ।
मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्भाव ॥ जय. ॥ ३ ॥
*******************
जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी ।
तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ धृ. ॥
त्रिभुवन हें लघु आहे तव पत्राहुनि अति ।
मुळिं ब्रह्मा मध्यें शौरी राहे तो बहु प्रीतीं ॥
अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारीं शोभती ।
दर्शनें तुझ्या पापे हरती गे मुळिहुनी ॥ जय. ॥ १ ॥
तव छाया शीतल दे व्यापक तूं भूतळी ।
बहु प्रीती मंजिरीची विधिजनका लागली ॥
तव दलावीण होते बहु त्यांते काहिली ।
कार्तिकी बहु आहे तव महिमा या जनीं ॥ जय. ॥ २ ॥
अच्युता माधवा हे मधुसूदना जगत्पती ।
तव पूजनीं बहु प्रेमें ऎसें जे गर्जती ।
देशी त्यां संततीही सुख सारें बहु प्रीती ।
विठ्ठलात्मज विनवि भावें मज तारी स्वामिनी ॥ जय. ॥ ३ ॥
*******************
वृंदावनवासी जय माये तुळसी ।
शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥
मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी ।
तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥ १ ॥
जय देव जय देवी जय तुळसी माते ।
करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ धृ. ॥
कार्तिकशुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न ।
तुझे वृंदावनी निशिदिनिं श्रीकृष्ण ॥
स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण ।
भक्त चिंतन करितां करिसी पावन ॥ जय. ॥ २ ॥
त्रिभुवनिं तुझी सेवा करिती त्रिकाळ ।
त्यांतें सुख देऊनी तारी गोपाळ ॥
तुझें स्तवन ऎकुनि कांपति कळिकाळ ।
पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ ॥ जय. ॥ ३ ॥
*******************
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥