रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या (संपूर्ण संग्रह)

मंगळवार, 4 मार्च 2025 (15:57 IST)
गणपती आरत्या
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ||
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती |
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
जयदेव जयदेव || १ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुंम केशरा |
हिरे जडित मुगुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपूरे चरणी घागरीया ||
जयदेव जयदेव || २ ||
लंबोदर पितांबर फणिवरबंधना|
सरळशुंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ||
जयदेव जयदेव ||३||
 
******************
आरती सप्रेम जय जय स्वामी गजवदना |
तुझिया स्मरणे जाति पातके पार्वतीनदंना ||
मोरया पार्वतीनंदना || धृ ||
मस्तकी मुकुट जडिताचा शोभतो जाण |
कानी कुंडलांची दीपके झळकती परिपूर्ण ||
पायी घुंघुरवाळे घालुनि शोभति चरण |
तुझिया दोंदावरी कंठी पदक घालून ||१||
मुषक वाहनावरी स्वारी करोनिया फिरसी|
चंद्रमा तुजला हसे म्हणुनी शाप दिधलासी |
तेहतीस कोटी देव मिळोनी प्रार्थियले तुजसी |
दया करा महाराज उ:शाप देउनिया त्यासी || २ ||
भाद्रपद शुध्द चतुर्थीचा दिवस सुदिन|
त्या दिवशी या चंद्रम्याचे पाहू नये वदन|
हाच शाप दिधला त्यासी ऐका हो जन |
जे जन पाहतील मुख त्यासी दुःख पीडा जाण || ३ ||
वत्से रक्षित असता कृष्णे सोम पाहिला|
स्यमंतक मणि जांबुवंत गृहा समीप नेला|
आळ आली श्रीकृष्णावरी क्रोधाने चढला|
शोधा लागी जाता तेव्हा जांबुवंत मिळाला || ४ ||
रामचंद्रे जांबुवंते होते बोलणे |
यास्तव आता जाणे जाले युध्दा कारणे |
युध्द प्रसंग टळला तेव्हा कन्यका देउन |
मणि आंदण दिधला तेव्हा आले परतून ||५||
सत्राजिता श्री कृष्णाने मणि जो दिधला|
असत्य भाषण करिता त्यासी क्रोध बहु आला|
सत्यभामा बोलावून दिधली कृष्णाला|
मणि आंदण देउनि त्यासी समाधान केला ||६||
गोपिकांचे गृही श्रीहरी भक्षी नवनित|
गोपी जाउनि यशोदेपाशी सांगती वृत्तांत |
कृष्ण तुझा चांडाळ येउन धरी आमुचा हात|
काय सांगू यशोदे, त्याची करणी अघटीत || ७ ||
ऐसी वार्ता कानी पडता माता घाबरली|
जाउन एकदंतापाशी नवस बोलली|
संकष्टीची व्रते तुझी करीन मी आगळी |
खोडी चोरी श्रीहरी सोडी जाउ नको गोकुळी || ८||
यशोदेने नवस पूर्ण जाले म्हणोनिया|
व्रते नरनारी करतील मोरया|
पतित मी आळशी माझी मतिमंद काया|
दास म्हणे मस्तक नित्य तुझे पाया || ९ ||
******************
जय देव जय देव जय जय गणराजा |
सकळ देवा आधी तू देव माझा || धृ ||
उंदरावरी बैसोनी दुडादुडा येसी |
हाती मोदक लाडू घेउनिया खासी|
भक्तांचे संकटी धावूनि पावसी |
दास विनविती तुझिया चरणासी || १ ||
भाद्रपदमासी होसी तू भोळा |
आरक्त पुष्पांच्या घालुनिया माळा |
कपाळी लावुनिया कस्तुरी टिळा |
तेणे तू दिससी सुंदर सावळा || २ ||
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापिला|
समयी देवे मोठा आकांत केला|
इंदु येउनिया चरणी लागला|
श्रीरामा बहुत श्राप दिधला || ३ ||
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा |
नेत्र शिणले तुझी वाट पाहाता |
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता|
मजला बुध्दी देई तू गणनाथा || ४ ||
******************

श्रीराम आरत्या
 
जयजय पूर्णकामा । जय आत्मयारामा ।
नवलाव आरति होती हो तुमची आम्हा ।। धृ ।।
निर्गुणी सगुण कैसे। लीळाविग्रह आंरभ ।
अन्वयउपाधि योगे। निर्बिंब हे न लाभे।
एकत्व न खंडता। अनेकत्व हे उभे।
ऐसी हे थोर सत्ता। नांदिजेत स्वयंभ ।।१।।
अपूर्व हेचि रीति । गुरूशिष्यसंवादु ।
अभेद पूर्ण तो हा । महाहरुष संवादु ।
जाणती अनुभवी । जया सदगुरुबोधु ।।
रुचि हे रामदास। आपआपणा स्वादु ।। २ ।।
 
******************
रावची नाही तेथे कैचे राउळ |
देवची नाही तेथे कैचे देउळ |
ठावचि नाही तेथे कैचे हो मळ |
इतकेहि बोलणे मिथ्या समूळ || १ ||
जय जय जय आरत जय पुरते जाले|
पुरते अपुरतया श्रीरामे नेले || धृ ||
रामचि नाही तेथे कैचा हो दास|
दासचि नाही तेथे कैचा उदास |
उदास आहे परि नाही आभास|
आभास केल्या होय पूर्णत्वा नास || २||
माया कर्पूर आत्मादीपे प्रगटला|
तेणे तेजे अवघा भंबाळ जाला|
तेथे रामदास दीपचि जाला|
लहानाळुनी आपेआप निवाला || ३||
******************
साफल्या निजवल्या कौसल्या माता |
भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता|
खेचर वनचर फणिवर भरता निजभ्राता|
दशरथ नृपनायक धन्य तो पिता
जयदेव जयदेव जय रघुकुळटिळका |
आरती ओवाळू त्रिभुवननायका | जयदेव जयदेव || १ ||
आचार्या गुरूवर्या कार्याचे फळ |
रविकुळमंडण खंडणसंसारमूळ ||
सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ |
धन्य तो निजदास भक्त प्रेमळ || जयदेव जयदेव || २ ||
******************
भूमिपती भूजापती भूपती रतिवीरा|
सुरपतिरंजन मृगुपतिगंजन रणधीरा |
सरितापतिदंडणा रजनीचरहारा|
वानरपतिमंडण निर्जरशृंगारा || १||
जयदेव जयदेव सुरवरदा रामा|
मुनिजन मानसहंसा सुंदर गुणधामा ||धृ||
शरणागतवत्सला तरणोत्पलनयना |
तरणीवंशाभूषण धरणीधरशयना|
करणीकारण तारण जडजाड्याहरणा |
दासा पंजर लोभापर दुस्तरणा || ३ ||
******************
किरीट कुंडले माला वीराजे|
झळझळ गंडस्थळ घननिळ तनु साजे |
घंटा किंकिणी अंबर अभिनव गति साजे |
अंदू वाकी तोडर नूपुर ब्रिद गाजे ||
जयदेव जय रघुवीर ईशा |
आरती निर्जरवर ईशा जगदीशा || जयदेव जयदेव || १||
राजिवलोचन मोचनसुरवर नरनारी |
परतर पर अभयंकर शंकर वरधारी|
भूषणमंडीत उभा त्रिदशकैवारी|
दासा मंडण खंडण भवभय अपहारी| जयदेव जयदेव || २ ||
******************

सीतावरी रघुवीर शरयुतिरवासी |
योगीजनमनमोहन पावन सुखराशी |
नेणती अपार महिमा न कळे वेदासी|
श्रुती नेति नेति अगम्य सर्वासी || १ ||
जयदेव जयदेव जय सीतारमणा |
नकळे तुझा महिमा शास्त्रापुराणा || धृ ||
स्तुति करिता जिव्हा चिरल्या शेषाच्या|
नेणति पार अपार प्रकाश हा तुमचा ||
अंत नाही अनंत प्रांत मायेचा |
ब्रह्मादिका न कळे जप तो शिवाचा || २ ||
चारी वाचा शिणल्या नि:शब्द शब्दाचा |
भावनेचा अभाव ठाव मुक्तीचा |
मीतूपण कैचे सोहळा सुखाचा|
तो हा राघव स्वामी रामदासाचा || ३ ||
******************
भंबाळ कर्पूराचे | दीप रत्नकीळाचे ||
उजळले दिग्मंडळ | मेघ विद्युल्लतांचे ||
दिसती तैशापरी | भार चंद्रज्योतीचे ||
जयजया दीनबंधु | भक्तकरुणासिंधु ||
आरती ओवाळीन शिवमानसी वेधु ||धृ||
त्राहाटली दिव्य छत्रे | लागल्या शंखभेरी|
थरकती मेघडंबरे| दाटल्या उभय हारी ||
फडकती ते निशाणे | तडक वाजती भारी ||
तळपती मत्स्यपुच्छे | तेणे रोग थरारी || २ ||
मृदंग टाळ घोळ | उभा हरिदास मेळ ||
वाजती ब्रह्मविणे | उठे नाद कल्लोळ ||
साहित्ये नटनाटय | भव्य रंग रसाळ ||
गर्जती नामघोष | लहान थोर सकळ || ३ ||
चंपक पुष्पयाती | मिळाल्या असंख्याती ||
धुशर परिमळांचे लेणे | तेणे लोपली क्षिती ||
चमकती ब्रहवृंदे | पाउले उमटती ||
आनंद सर्वकाळ | धन्य जन पाहती || ४ ||
ऐसा ऋषिकुळवेष्टित हा | राम सूर्यवंशीचा |
जाहाली अति दाटणी | पुढे पवाड कैचा|
सर्वही एक वेळा | गजर घोष वाद्यांचा ||
शोभतो सिंहासनी | स्वामी रामदासाचा || ५ ||
******************
सुंदर सिंहासनी त्रिदशा कैवारी |
दक्षिणभागी उभा सखा अवतारी ||
वामांगी ती उभी सीता सुंदरी |
आज्ञाधारक सन्मुख रूद्र अवधारी || १ ||
जय देव जय देव जय अयोध्याधीशा|
आरती ओवाळू स्वामी जगदीशा || धृ ||
मस्तकी मुकुट किरीटी तेजाळ |
झळझळ झळकती कीळा भासे कल्लोळ ||
मकराकृती कुंडले रत्ने सुढाळ|
कस्तुरी केशर सुंदर भाळी परिमळ || २ ||
चाप केवती भृकुटी व्यंकट सुरेख |
आरक्त लोचन सुंदर सरळ नासिक |
रसाळ सुढाळ भाळ भव्य सुरेख |
दिनकर कोटी उपमे तुळे मयंक || ३ ||
अजानुबाहु वक्षस्थळ सुंदर मुगुटी |
मुक्ते रुळती माळा रत्नांच्या कंठी ||
मर्यागर दूसर केशर सर्वांगे उटी|
त्र्यंबक धनुष्य शोभे शंकर संपुटी ||४||||
कासे कसिला पीतांबर पिवळा |
चरण कमळी रूळे वृंदाची माळा ||
घननीळ तनु सुंदररूपे सावळा |
रामदास वंदी चरणांबुज कमळा || ५ ||
******************
कथेचे शेवट आता उजळू आरती ||
ओवाळू मेघश्याम सावळी मूर्ति || धृ ||
सिंहासनी शोभे देव सुरवरकैवारी|
दक्षिणेसी शेष वामे सीता सुंदरी ||१||
भरत शत्रुघन माता कौसल्या पाहे |
जोडुनि पाणी सन्मुख हनुमंत आहे || २ ||
भक्तराज दोही भागी उभे राहिले ||
स्वानंदे गर्जती धूशर उधळीले ||३||
वाजंत्र्याची घाई एक गर्जना जाली|
रामदासा आनंद जाला कथा संपली ||४||
******************
आता लावा रे पंचारती|
राम लक्ष्मण सीता मारुती ||धु ||
राम दृष्टीने राम पहा | नीट सन्मुखे उभे राहा ||
राम होउनी राम तुम्ही पाहा || १ ||
ध्यान आव्हान आसन जाण| पाद्य अर्घ्य आचमना ||
काही नेणे मी रामावीण || २||||
स्नान परिधान उपविति गंध | केशर कस्तुरी सुमन सुगंध ||
काही नेणे मी मतिमंद ||३||
धूप दीप नैवेद्य जाण | विडा दक्षणा निरांजन|
काही मंत्रपुष्पादि प्रदक्षणा ||४||||
पंचभूतादि पांचहि प्राण | करा रामासी समर्पण ||५||
रामलक्ष्मण सीताबाई | राम कल्याण नित्य गाई |
राम व्यापक सर्वा ठाई ||६||
रामी रामदास म्हणे | रामावीण मी कांही नेणे ||
राम माझा जीवप्राण ||७||
******************

काकड आरती परमात्मा श्री रघुपती |
जिवाजिवां प्रकाशसी कैसी निजात्म ज्योती ||धु ||
त्रिगुण काकडा व्दैत घृते तिंबिला |
उजळिली निजात्मज्योती तेणे जळोनि गेला ||१||
काजळी ना म्हैस नाही जळजळ ढळमळा |
अवनी ना अंबर प्रकाश निघोट निश्चला ||२||
उदयो ना अस्तु तथा बोध: प्राप्तकाळी |
रामी रामदासी सहजी सहज वोवाळी ||३||
******************
बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी
आरत्या घेउनि करी झाल्या त्या नारी ||१||
श्यामसुंदर रामा चरणकमळी |
ओवाळू आरती कनक गंगाजळी ||२||
चौघी म्हणती सुमनशेजे चला मंदिरा |
नव त्या इच्छिती सेवा श्यामसुंदरा ||३||
दास म्हणे सुमनशेजे चला श्रीहरी|
क्षण एक विश्रांति घ्या हो अंतरी ||४||
******************
स्वामी चला हो निजमंदिरा |
सुखसेजेसी रघुवीरा|
राघवा चला जी निजमंदिरा ||धृ||
सकळासी तांबुल सकळ पुष्पमाळा |
भक्तांचा सोहळा पुरविला ||१||
भक्तजनपालक ब्रह्मांडनायक |
जय रघुकुळटिळक स्तविती दासा ||२||
येउनी जनकात्मजा अहो जी रघुराजा|
तिष्ठतसे तुझा मार्ग लक्षी || ३||
जाली वाढ राती अहो रघुपती |
मार्ग सोडविती बंदीजन ||
उठले जगजीवन सिंहासनावरून |
वेगी निंबलोण उतरिले || ५ ||
******************
यथा शक्ति सेवा जाली | देवराया निद्रा आली|
रमा वाट पाहे ही | शेजे सुमनांचे मंदिरी ||१||
धर्म अर्थ काम मोक्ष | पहा मंचक प्रत्यक्ष |
चौकुनी चारी समया | एका ज्योती प्रकाशल्या ||२||
आपला आपण उपचार | भोगी भोग निरंतर |
ऐसे रघुराज पहुडले | दासा प्रसादा लाभले ||३||
 
******************
श्रीराम पहुडले निज मंचकावरी|
उभी ती जानकी बाळा घेऊनी आरत्या करी ||१||
समया पाजळती रत्नज्योती प्रकाशती|
हनुमंत जांबुवंत पुढें उभे राहती||२||
नैवेद्य पंचखाद्य खर्जूर शर्करा|
नारळादि फळे द्राक्षे रामराया अर्पिली||३||
राघवे निद्रा केली मौन वाचा राहिली|
रामी हो रामदासी समाधी लागली||४||
 
******************

मारुतीची आरत्या
 
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||
कडाडिले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी
सुरवरनर निशाचर त्या जाल्या पळणी ||
जयदेव जयदेव जयजय हनुमंता
तुमचेनि प्रतापे न भिये कृतांता || जयदेव जयदेव || १ ||
दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द|
धगधगिला घरणीधर मानिला खेद ||
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद|
रामीरामदासा शक्तीचा शोध || जयदेव जयदेव ||
 
******************
कोटीच्या कोटी गगनी उडाला|
अपचळ चंचळ द्रोणाचळ घेवोनि आला ||
आला गेला आला कामा बहुताला |
वानर कटका चटका लाउनिया गेला ||
जयदेव जयदेव जयजय बलभीमा|
आरती ओवाळू सुंदर गुणसीमा| जयदेव जयदेव || १ ||
उत्कट बळ ते तुंबळ खळबळली सेना|
चळवळ करिता त्यासी तुळणा दिसेना ||
उदण्ड कीर्ति तेथे मन हे वसेना|
दास म्हणे न कळे मोठा की साना || जयदेव जयदेव || २ ||
******************
भीम भयानक रूप अद्भूत |
वज्रदेही दिसे जैसा पर्वत ||
टवकारूनि नेत्र रोम थरथरीत |
स्थिरता नाही चंचळ जाला उद्दीत ||
जयदेव जयदेव जय महारूद्रा|
आरत भेटीचे दीजे कपींद्रा || जयदेव जयदेव ||१||
हुंकारूनि बळे गगनी उसळला |
अकस्मात जानकीसी भेटला ||
वन विध्वंसूनि अखया मारिला
तत्क्षणे लंकेवरी चौताळिला || जयदेव जयदेव || २||
आटोपेना वानर हटवाटी धीट|
पवाडला जाळू पाहे त्रीकूट |
मिळोनि रजनीचर करती बोभाट
धडाडीला वन्ही शिखा तांबट || जयदेव जयदेव || ३ ||
कडकडीत ज्वाळा भडका विशाळ |
भुभुःकारे करूनी भोवी लांगूळ |
थोर हलकालोळ पळती सकळ |
वोढवला वाटे प्रळयकाळ || जयदेव जयदेव || ४ ||
तृतीय भाग लंका होळी पै केली|
जानकीची शुध्दि श्रीरामा नेली ||
देखोनी आनंदे सेना गजबजली |
रामीरामदासा निजभेटी जाली || जयदेव जयदेव || ५ ||
******************
दशरथे यज्ञ केला ऋषिप्रसाद आला|
विभागिता तिन्ही भाग एक अंजनी नेला ||
तयाचा पूर्णपिंड रूद्रअवतार जाला|
पूर्णपिंड म्हणोनीया बहुबळ लाधला ||१||
जयजया पवनतनुजा जय राघवप्रिया |
आरती ओवाळीन सकळबलाढ्य वर्या ||
भक्तजन चूडामणि प्रेमळ ब्रह्मचर्या |
ज्ञानविज्ञानघना सुनीळतनु वज्रदेह्या || धृ ||
उपजता बालपणी जेणे गिळिला तरणी|
पुनरपि उगळिला पोळला म्हणवूनि |
ते वेळ हनुवटे वज्र हाणिला सत्राणी|
रोम हि न तुटे चि हनुमंत नाम तेथूनी || २ ||
अंजनीवरद जाले कासोटीस ओळखले|
तोचि स्वामी तुझा येरे जीवी धरियले |
क्रीडता द्रुमगर्भी राघवे ओळखिले |
येरू म्हणे स्वामी माझा लोटांगण घातले || ३ ||
स्वामीचे कृतकार्य तरला सिंधुतोये|
राक्षसे निद्राळूनी भेटला जानकीये|
क्षुधेचेनि मिषे वना अंतकु होये|
जाळिली लंकापुरी वंदिले रामपाये ||४||
गोष्पदातुल्य मेरू उडोनिया गेला |
योजने चारकोटी द्रोणाचळ आणिला |
विस्तीर्ण सहस्त्रयोजन पुष्पप्राय झेलिला||
लक्ष्मण प्राणदाता ऐसा जनवाद जाला ||५||
कृतांत काळनेमी मार्ग रुंधिला तेणे|
विवसी उध्दरोनी घेतले प्राणे ||
पर्वत घेऊनि येता भरते विंधिला बाणे|
नामासि देउनि मान पर्वत नेला सत्राणे ||६||
रघुनाथ विजयी जाले सकळ कपी गौरविले |
ते वेळ प्रेमे प्रीतिनिकट दास्य घेतले ||
हे तुझे कीर्तितेज त्रिभुवनी फाकले|
रामीरामदासे आरत ओवळिले ||७||
 
******************

सद्गुरू मुख्य मारूत कर्ण व्योमी विचरत|
तयाचा निजगर्भी जाला बोध हनुमंत ||
निजबळे निजकीर्ती केली विख्यात |
तयाचेनी स्मरणमात्रे कळिकाळ कापत || १||
जय जय हनुमंता जयाची पूर्ण शिवा |
आरती ओवाळीन जीवाचिया जीवा ||धृ.||
जीवशिवऐक्य तेहि केले सुग्रीवा रामा |
इंद्रिय हेच कपि लाविले निजकामा ||
भवसिंधु तरूनिया राघवांगना रामा |
शोधुनि काम क्रोध दमिले राक्षस भीमा ||२||
ऐसे निज काज सिध्दी गेले जनी जैत्य आले|
जानकी सहित राम ऐक्य राजी राहीले ||
हनुमंतपण तेथे ना राहेचि वेगळे |
रामी रामदासी आरते ओवाळीले ||३||
 
******************
अंजनीसुत हा नयनी निज अंजन लावी |
षड्रिपु भंजून सत्वर निरंजन दावी ||
त्याविण तरती दुस्तर भवसागर केवी|
त्रैलोक्याचा नायक जिवलग ज्या भावी ||३||
जय देव जय देव जय एकादशरूद्रा|
सहजी प्रकाश दिधला त्या दिनकर चंद्रा ||धृ||
रजनीपती वौशीनर अभिमाना चढला||
गर्वाचा शरपंजर शतचूर्ण केला ||
पाताळी फणि मस्तक चुळचुळा जाला |
तो हा कपि दासांचे ध्यानी सापडला ||४||
 
******************
दृढ लांगुल वज्रांग विक्रांत वल्या |
तिक्ष्णनख रोमावली अतिवक्रा ||
पिंगट नेत्रा उचलुनि पाणि चपेटा मर्दुनि रिपुगात्रा |
त्रिभुवन विक्रम विस्मित राघव प्रियपात्रा || १||
जय देव जय देव पवनतनुज भीमा |
अनुसरज प्रतिपाक अगणित गुणसीमा ||धृ||
पीतांबर कुंडल गिरिवरसमलीला|
शेनाचल करतलवत अगणित अवलीळा |
रघुविरदासा मंडण भवखंडण हेला|
अनुदिनी सन्मुख तिष्ठतु जोडोनि करयुगुला || २ ||
 
******************
जय जय भीमराया जयजय भीमराया |
ब्रह्मांडा येवढी तुझी वज्रकाया ||धृ||
वज्र लांगुल पुरते | जाते ब्रह्मांडा वरते ||१||
फार चंचळ चपळ | बळ लागले तुंबळ ||२||
ऐसा दुजा वीर कैचा | दास होये रघुनाथाचा ||३||
 
******************

श्रीकृष्ण आरत्या
करूणाकर गुणसागर गिरिवरधर देवे |
लीला नाटकवेष धरिला स्वभावे |
अगणितगुणलाघव हे कवणा ठावे |
वज्रनायक सुखदायक काय वर्णावे ||
जयदेव जयदेव जय रमारमणा |
आरती ओवाळू तुज नारायणा || जयदेव जयदेव || १||
वृंदावन हरिभुवनी नुतन तनु शोभे |
वक्रांगे श्रीरंगे यमुनातटी शोभे |
मुनिजनमानसहारी जगजीवन ऊभे |
रविकुळटिळकदास पदरज त्या लाभे || २ ||
******************
जय जय यादवा रे जय जय यादवा रे|
तुझे ध्यान लाभले माधवा रे ||धृ.||
होसी भक्तांचा कोवसा |
भवार्णवी भरवसा ||१||
भार फेडीला महीमा|
कैवारी तू पांडवाचा ||२||
दास म्हणे मनोहर |
कृष्ण आठवा अवतार ||३||
 
******************

विठ्ठल आरत्या
 
निर्जरवर स्मरहरधर भीमातिरवासी|
पीतांबर जघनी कर दुस्तर भव नाशी ||
शरणागत वत्सल पालक भक्तांसी|
चाळक गोपिजनमन मोहन सुखराशी ||
जयदेव जयदेव जय पांडुरंगा |
निरसी मम संगा निःसंगा भव गंगा || जयदेव जयदेव ||१||
अणिमा लघिमा गरिमा नेणति तव महिमा |
नीलोत्पलदल विमला घननिल तनु शामा ||
कंटकभंजन साधूरंजन विश्रामा|
राघवदासा विगलित कामा निःकामा || जयदेव जयदेव ||२||
******************
जय जय पांडुरंगा जय जय पाडुरंगा|
तुझ्या दरूषणे दोष जाती भंगा ||धृ||
पुंडलिकालागी आला | ईटेवरी उभा केला ||१||
ठाई ठाई टाळघोळ | मोठा कथेचा कल्लोळ || २ ||
दास म्हणे भीमातीरी| येकवेळ पाहा रे पंढरी ||३||
******************
जय देव जय देव पांडुरंगा ||
आरती ओवाळू अघ ने निजमंगा ||धृ||
श्रीमुख सुंदर कुंडल मस्तकी ज्योतिर्लिंग शोमा|
कटी तटी पीत वसने विद्युत् प्राय शोमत |
जडितसिंके झलपलित तेजे झाल झलित ||१||
पांचजन्य करयुगि घरिलासे पाहे |
समचरणाची शोमा अभिनव नटताहे ||
भीमा तट सन्निध पुंडरिक राहे|
वेणुनादे मुनिजन वेधियले पाहे ||२||
ऐसी मूर्ती इटे पूजिली निजनटे|
बह्मा इंद्र मध्यानि प्रगटे |
जय जयकारे सुखकर पंढरीये पेटे |
दास चरणी मधुकर सेवनी निजविनटे ||३||
 
 
 
******************
 
शंकर आरत्या
 
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा |
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा |
लावण्यसुंदरी मस्तकी बाळा |
जयदेव जय श्रीशंकरा, हो स्वामी शंकरा |
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा || जयदेव जयदेव ||१||
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा |
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |
विभूतीचे उधळण शितीकंठ नीळा |
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा || जयदेव ||२||
देवी दैत्यी सागरमंथन पै केले |
त्यामाजी अवचित हलाहल जे उठिले |
ते त्वां असुरपणे प्राशन केले |
नीळकंठ नाम प्रसिध्द झाले | जयदेव जयदेव ||३||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी |
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ||
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी|
रघुकुळटीळक रामदासा अंतरी || जयदेव जयदेव ||४||
 
 
******************
जय देव जय देव जय रतिपतिदहना|
मंगल आरती करतो छेदी अघविपिना ||धृ||
गौरीवर गंगाधर तनु कर्पुर ऐशी |
गज व्याघ्राची चर्मे प्रेमे पांघुरसी |
कंठी कपाळा माळा भाळी दिव्यशशी|
अनिलाशन भूषण हर शोभत कैलासी ||१||
त्रिपुरासुर अतिदुस्तर प्रबळ तो जाला |
तृणवत मानित वासव विधि आणि हरिला ||
तेव्हा निर्जर भावे स्मरताती तुजला|
होऊनि सकृप त्यावरि मारिसी त्रिपुराला ||२||
जे तव भक्ति -पुरस्सर जप तप स्तव करिती |
त्याते अष्टहि सिद्धी स्वबलाने वरिती ||
शिव शिव या उच्चारे जे प्राणी मरती |
चारी मुक्ती येउनि त्यांचा कर धरती ||३||
वृषभारूढ मूढा लावी तव भजना |
भवसिंधु दुस्तर तो करी गा सुलभ जना ||
होवो सुलभ मला तव मायेची रचना |
दास म्हणे ताराया दे सकृप वचना ||४||
 
******************

जय देव जय देव जय अजिनांबर धारी|
आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारी ||धृ ||
उपमा नाही रूपी निर्गुण गुण रहिता|
कैलासाहुनि मानस धरिला भजकार्था |
काशी आदि करुनि गणनाच्या तीर्था |
लिंगदेहे वससी भक्तिभावार्था ||१||
गजचर्मपरिधान शशि धरिला शिरी|
भूधर जिंकुनि कंठी केली उत्तरी||
जटाजूट वसे गंगासुंदरी |
वाहन नंदी तुझे अर्धांगी गौरी || २ ||
मंगलदायक तुझे शिवनाम घेता |
तत्क्षण भस्म होती तापत्रय व्यथा ||
अभिन्न भिन्न भाव दासाच्या चित्ता|
चरणविरहित न करी मज गौरीकांता || ३ ||
******************
विष्णू आरत्या
कमळावर कौस्तुभधर क्षिरसागरवासी ||
पतीत पावन नामे अगणित गुणरासी |
नाभी कमळी ब्रह्मा अग्रज मदनासी |
न कळे महिमा स्तविता दशशतवदनासी ||१||
जयदेव जयदेव जय पंकजनयना |
आरती ओवाळू तुज पन्नगशयना ||धृ.||
अरिदंडण भवखंडण मंडण देवांचे |
हरी दुरित परिपूरित निजहित सकळांचे |
दशशतवेष्टित शोभे स्वरूप गरूडाचे |
राघवदासी भजन पूजन सगुणाचे || २ ||
 
******************
 
जय देव जय देव जय लक्ष्मीकांता |
मंगल आरती करितो भावे सुजनहिता ||धृ.||
नारायन खगवाहन चतुरानन ताता|
स्मर अरिताप विमोचन पयनिधि जामाता ||
वैकुंठाधिपते तव महिमा मुखि गाता |
सहस्रमुखांचा तोही थकला अनंता ||१||
सदैव लालन पालन विश्वाचे करिसी |
दासास्तव तू नाना अवतार धरिसी |
दुष्टा मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी|
निशिदिनी षण्मुख तातांचे ह्दयी स्मरसी ||२||
 
 
******************
वेंकटेश्वर आरत्या
अघहरणी पुष्करणी अगणित गुणखाणी |
अगाध महिमा स्तविता न बोलवे वाणी ||
अखंड तीर्थावळी अचपळ सुखदानी|
अभिनव रचना पाहता तन्मयता नयनी ||
जयदेव जयदेव जय व्यंकटेशा ||
आरती ओवाळू स्वामी जगदीशा || जयदेव जयदेव ||१||
अति कुसुमालय देवालय आलय मोक्षाचे|
नाना नाटक रचना हाटक वर्णाचे ||
थकित मानस पाहता स्थळ भगवंताचे|
तुळणा नाही हे भुवैकुंठ साचे || जयदेव जयदेव ||२||
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल नीला |
नाना रत्ने नाना सुमनांच्या माळा ||
नाना भूषण मंडित वामांगी बाळा |
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा || जयदेव जयदेव ||३||
 
******************
जय जय वेंकटेशा जय जय वेंकटेशा
मूळपुरुषा तू जगदीशा ||धृ.||
केवळ वैकुंठभुवन | उदंड येती भक्तजन ||
जन होताती पावन ||१||
गिरी शेषाद्री मस्तकी | नाटकदेशी कर्नाटकी|
भजिजे पुण्यश्लोक लोकी ||२||
रथ उत्साह घडघडाट || ३ ||
वृक्ष नाना पक्ष याती| नानापक्षी ते बोलति ||
जळे निर्मळ वाहती ||४||
तेथे पुरति कामना | बहुतांच्या मनकामना ||
दास म्हणे जगजीवन ||५||
 
******************

श्री सद्गुरु आरत्या
 
जय देव जय देव जय अलक्ष्यलक्ष्या|
जय गुरूराज दयाघन विश्वांतरसाक्षा ||धृ.||
ब्रह्मानंद सुखाचा तू कंद बापा|
भावातीता हरसी दास त्रय तापा ||
अगाध महिमा तुझा कोण करी मापा|
मंगळधामा रामा सदुरू निष्पापा ||१||
होउनि सकृप मूढा तू हाती धरिसी|
अघनग भस्म करोनि त्याते उध्दरिसी ||
स्पर्शुनि मस्तकी पाणी त्या ब्रह्म करिसी| |
आत्मस्वरूपा दाविसि होउनिया अरसी ||२||
अग्नी काष्ठा देतो आपुले रूप जसे|
आपण करता प्रेमे शिष्यलागी तसे ||
शिष्याचे तव स्मरणे भवभय नासतसे |
सदैव ब्रह्मस्वरूपी होउनि राहतसे ||३||
ऐसा तू गुरुराया विश्वाचा दाता|
सकृप होउनि कळवी मजला वेदांता ||
महाराजा अजुनी तरी अंत किती पाहता|
दास म्हणे मी बुडतो काढि धरुनि हाता ||४||
 
******************
 
सुखसहिता दुखरहिता निर्मळ एकांता |
कलिमलदहना गहना स्वामी समर्था |
न कळे ब्रह्मादिका अंत अनंता |
तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ||
जयदेव जयदेव जय करूणाकरा |
आरती ओवाळू सद्गुरूमाहेरा || जयदेव जयदेव ||१||
मायेविण माहेर विश्रांती ठाव |
शब्दी अर्थलाभ बोलणी वाव ||
सद्गुरूप्रसादे सुलभ उपाव |
रामीरामदासा फळला सद्भाव || जयदेव जयदेव || २ ||
 
******************
 
जय जय आरती श्री गुरू स्वामी समर्था |
दयाळा स्वामी समर्था |
काया वाचा जीवे भावें ओवाळिन आता || धृ ||
ब्रम्हा विष्णु हरादिक मानसी ध्याती |
सुरवर किन्नर नारद तुंबर कीर्तनी गाती ||
आगम निगम शेष स्तवितां मंदसी मती |
तो तूं आम्हा पूर्ण काम मानवां प्राप्ती || १ ||
ऋषीवर मुनिवर किन्नर देवा तुझे स्थापिलें |
षड्दर्शनी मत्त गुमानी पंथ चालिलें ||
अपरंपार परात्परा पार न कळे |
पतित प्राणी पदर लागुनी कल्याण जालें || २ ||
 
 
******************
 
भैरव आरत्या
 
दक्षिण देशामाजी भैरव तो देव |
क्षेत्रपाळ बंदी लोकत्रय भाव |
भक्तासी देखूनी चरणी दे ठाव |
देवाचा तारक भैरव देव ||
जयदेव जयदेव जय भैरवदेवा |
सद्भावे आरती करितो मी देवा || जयदेव जयदेव ||१||
वामांगी जोगेश्वरी शोभे सुंदर|
कासे पितांबर वाद्यांचा गजर ||
भक्तासि देखोनि हरि कृपाकर|
रामदास चरणी त्या मागे थार| जयदेव जयदेव || २ ||
 
 
******************
 
जय देव जय देव जय क्षेत्रपाळा |
आरती ओवाळू तूज रे गोपाळा ||धृ.||
नाना क्षेत्रे पाळक चाळक सुष्टीचा |
वोळे घन आनंदाचे वृष्टीचा ||
संकटमोचन देव कृपादृष्टीचा |
कैपक्षी सामर्थे भक्त पुष्टीचा ||१||
त्रिशूळ डमरू सिंगी योगी वीतरागी|
अभिनव महिमा न कळे भोगी ना त्यागी|
दर्शनमात्रे सेवक होती वीभागी|
सर्वाभूती पाहा या देवालागी || २ ||
चळवळ चळवळ जिकडे तिकडे देवाची |
अगणित महिमा कोणी लिही ना वाची ||
का रे काही सेवा न करा फुकाची |
दास म्हणे बुध्दि न करावी काची || ३ ||
******************
 
जय जय भैरवा रे| जय जय भैरवा रे|
तुझे भजन लागे सदैवा रे| काळ भैरव काळ भैरव|
टोल्या भैरव बटुक भैरव ||
नाना प्रकार विखार | त्याचा करतो संव्हार |
काळ काळाचाही काल| दास म्हणे क्षेत्रपाळ ||
 
******************

दत्तात्रेय आरत्या
 
जय जय श्री दत्तात्रेय औदुंबरवासी |
मंगल आरती करितो मम भवभय नाशी ||धृ.||
देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी|
अक्षय सुख अवदुंबर छात्रे विचरसी ||
श्रीकृष्णातटी राहुनि दासा उध्दरसी|
जडमुढा ताराया अवतार धरिसी ||१||
काय तुझा महिमा वर्णावा आता|
मारिसी भूत समंधा सक्रोधे लाथा |
नाना रोग दुरत्यय तव तीर्थ घेता|
पुनरपि श्रवण न ऐकति गदरिपुची वार्ता ||२||
तुझे क्षेत्र मनोहर या अवनीवरती|
त्याते पाहाता वाटे स्वर्गासम धरती|
आंनदे व्दिज भारत पारायण करिती|
त्रिकाळ सप्रेमाने करिती आरती ||३||
मी अघसागर तू हो अगस्तिऋषि देवा |
प्राशुनि वारी दे मज त्वत्पदिजा ठेवा|
बाधो ना मज किमपी प्रापंचिक हेवा|
दास म्हणे हे बाळक अपुल्या पदि ठेवा || ४ ||
 
 
******************
विधिहरिहर सुंदर दिगांबर झाले |
अनुसूयेचे सत्त्व पहावया आले|
तेथे तीन बाल करूनि ठेविले |
दत्त दत्त ऐसे नाम पावले || १||
जयदेव जयदेव जय दत्तात्रया |
आरती ओवाळू तुज देवत्रया || धृ ||
तिही देवांच्या युवति पति मागो आल्या |
त्यांना म्हणे वळखूनि न्या आपुल्याला |
कोमळ शब्दे करुनी करुणा भाकिल्या |
त्यासी समजाविल्या स्वस्थानी गेल्या ||२||
काशी स्नान करविरक्षेत्री भोजन |
मातापुरी शयन होते प्रतिदिन |
तैसे हे अघटित सिध्द महिमान|
दास म्हणे हे तो नव्हे सामान्य || ३ ||
 
 
******************
खंडोबा आरत्या
 
पंचानन वाहन सुरभूषण लीला |
खंडामंडित दंडित दानव अवनीळा ||
मणिमल्ल मर्दून घुसर जो पिवळा |
करि कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा |
जयदेव जयदेव जयजय मल्लारी|
वारी दुर्जन वारी निंदक अपहारी || जयदेव जयदेव ||१||
सुरवैरी संहारा मजलागी देवा |
नाना नामे गाईन घडो तुझी सेवा ||
अगणित गुण गावया वाटतसे हेवा |
फणिवर शिणला जेथे नरपामर केवा || जयदेव जयदेव ||२||||
रघुवीरस्मरणे शंकर हृदयी नीवाला |
तो हा मदनांतक आवतार जाला |
यालागी आवडी भावे वर्णिला|
रामीरामदासा जिवलग भेटला || जयदेव जयदेव ||३||
 
 
 
******************
जय जय खंडराया | जय जय खंडराया |
म्हाळसा बाणाई तुला दोघी जाया|
हटाचा हे बिरुदेव मालो महिपती ||१||
अखंड नवरा वरि भंडारा उधळिति |
रोकडी प्रतीत जनामध्ये दाखवी|
तयासि भजता भक्त होताति खवी ||२||
भक्त कुत्रे वाघ मोटे अंदु तोडिति |
दास म्हणे दुर्जनाचि होतसे शांति ||३||
 
 
******************
देवी आरत्या
 
श्री जगदंबा आरती
जय देवी जय देवी जय जय श्रीअंबे |
ओवाळू आरती तुज भावे जगदंबे ||धृ.||
शिवमन भ्रमर कमलिनी जय आदि शक्ती |
षण्मुख गजमुख जननी जय जय अव्यक्ति|
भगवद् भेषज लतिके दासप्रिय भक्ति |
रज तम सत्वा न कळे अगम्य तव शक्ति ||
मोठा दुष्ट महीतळी महिषासुर जाला|
फोडुनि निर्जर प्रतिमा त्रासवि विप्राला |
भोगित सुंदर स्वबळे नृपतीच्या माळा |
हरि हर ब्रह्मा पाहुनि पळताती ज्याला |
त्रासविले गोब्राह्मण हे तुजला कळले
तत्क्षणि भक्तिहितास्तव प्रेमळ चळले ||
अरिचमुमंडळ भडभड तव क्रोधे जळले |
चरणतळे महिषासुर घुंघुरडे मारले ||३||
होउनी विजयी निर्जर स्थापियले स्वपदा |
ऐसी तू निजदासा नेसी भव्य पदा|
अनन्य चिंतुनी तुजला गाती नित्य पदा|
दास म्हणे त्या विपत्ती बाधेना च कदा ||४||
 
******************

अष्टभुजा आरती
सिंहासनावरी सिद्धमूर्ति बाळा |
अष्टभुजा अंबा सत्रावी कळा |
ध्यानासी आणिता तव म्यां देखियली डोळां| शिवबोधें निजतत्त्वें पंथ आगळा || १||
 
जयदेवी जयदेवी जय वो त्रिपुरे|
त्वरिता पुरस्वामिनी| मातापुर स्वामिनी|
तुळजापूर स्वामिनी |
तूं हा विश्वाधारें तोडी हा भवपाश भवकरुणाकरें
सोहं तत्त्वें निवदुनि तुझेचेनी आधारें || ध्रु०||
 
अष्टभुजा अंबा अष्ट आयुधें शोभती|
शंखचक्रगदा तुझे हातीं शक्ती ||
त्रिशूळ डमरु घटा जटा विभूति|
तुज म्यां देखिले नयनीं जाली ज्ञानाची स्फुर्ती || २ ||
 
सिद्धी बुद्धि मुक्ति ह्या तिन्हीं ज्योती|
सहज ब्रह्म माया आरती ओवाळिती ||
तुझे चरण तीर्थे कोटिकुळें उद्धरती|
नित्य स्वरूप ध्याये दास सनती || ३||
 
******************
महालक्ष्मी आरती
 
मर्दिला कोल्हासुर ख्याती केली की थोर|
श्रीलक्ष्मी नाम तुझें दैत्य कांपती फार ||
जयदेवी विष्णुकांते महालक्ष्मी गे माते|
आरती वोवाळीन तुज विज्ञान सरिते || ध्रु० ||
धन्य तो कोल्हापूर धन्य तेथींचे नर|
सकळहि मुक्त होती तुजला पाहातां सत्वर ||| २ ||
रहिवास कोल्हापुरी पंचगंगेच्या तीरीं|
सुविशाल सिंहासन विराजसी तयावरी || ३||
मागणें हेचि माये आतां दाखवी पाय |
उशीर नको लावू दास तुझा वाट पाहे ||४||
******************
महाकाली आरती
 
अनंतकोटी ब्रह्मांडाची जननी आदिमाया|
ब्रह्माविष्णुमहेश लागति तव पाया ||
नानारूपे धरिसी भक्तकाजासी कराया|
तुजवरी सतका करूनि टाकीन मम देहा || १||
जय देवी जय देवी जय महाकाळी |
पंचप्राणे आरती तुझिया पदकमळी ||धृ.||
सुरवर नर किन्नर भूसर यांची बहुदाटी |
तेथे मी पामर कैसी तव भेटी ||
अनाथ नाथे पाहे दिनाते करुणादृष्टी |
तुजविण तारक नाही कोणी मज दृष्टी ||२||
मी तव पातकी मोठा म्हणूनि अनमान करिसी|
तरी का पतितपावन धरिले ब्रीदासी ||
पतितोध्दरणे उध्दरि आपुल्या दासासी |
इच्छाफळ तू देई सकळा भक्तासी ||३||
 
 
******************
 
महामाया आरती
 
ओवाळू आरती महामाया पायी प्रीती|
मनोभावे पूजा भक्ति अर्पूनिया हो ||धृ.||
सहस्त्रावरी नरनारी विचित्र कल्पोनि देव्हारी|
विविध मनोपचारे बरी पूजा द्रव्याने हो ||१||
पुष्पांजली प्राणमेळी जिवा शिवा सहमेळी|
सुक्ष्मकाया पायाकमळी वाहोनिया हो ||२||
काही घडो काय पड़ो परि हे ध्यान न विसंडो|
तारो मारो अथवा बुडो दास हा अनन्य न्यायी ||३||
******************
 
शांतादुर्गा आरत्या
 
कवण अपराधास्तव जननी केला तू रुसवां|
मी तो ध्यातों हृदयीं तुजला अहर्निशी भावा || १ ||
जय जय दीनदयाळे शांत देई मज भेटी|
तव चरणाची स्वामिनी मजला आवडी मोठी || ध्रु० ||
चिंताकूपीं पडलों कोण काढिल बाहेरी|
धावें पावें झडकरी अंबे करुणा तू करी || २||
माता पिता गुरु दैवत सर्वहि तूं चि|
तुझ्यावांचूनि देवी मजला कोणी न लगेची || ३||
काय असे पाहुनि अंगीकार त्वां केला|
आता करणें त्याग तरि हे अघटित ब्रीदाला ||४||
वेदशास्त्रं आणि पुराणें गर्जति अपार |
नाम घेतां हरिती किल्मिष पुरवी अंतर ||५||
दास शरण हा अनन्यभावें करितो विनंती |
तुजवांचोनि मजला न गमे निश्चय दे सुमती || ६ ||
******************
सौम शब्दे उदोकार वाचे उच्चारा|
भावे भक्त विनवी शांते चाल मंदिरा ||धृ||
नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा |
सुमनाचे परिवारी शांते शयन करा || १ ||
अष्टहि भोग भोगुनि शांता पहुडली शेजे|
भक्तजनांची आज्ञा जाहली चलावे सहजे ||२||
मानस सुखी दशमस्थाने निद्रा हो केली|
रामदास म्हणे शांता ध्यानी राहिली || ३ ||
******************

तुळजी भवानी आरती
 
सुरवर वरदायिनी मुरहर सुखसदना |
परतर परवासिनी अरिवर विरकदना ||
व्यापक सर्वा घटी जननी हे मदना|
करुणासागर रूपे नागर शशिवदना ||
जयदेवी जयदेवी जय विश्वंभरिते|
आरती ओवाळू तुळजे गुणसरिते ||१||
सकळा संजीवनी मुनिजन मनमोहिनी |
जनवन विज्जन मज्जन सज्जन तमशमनी |
दासा अभ्यंतरी मानस मृदु शयनी ||
राघववरदा सुंदर लाघव मृगनयनी || जयदेवी जयदेवी ||२||
 
 
******************
सरस्वती (वेदमाता) आरती
 
अजरामर पन्नगधर वैश्वानरभाळी |
रसाळ वदना विशाळ नयनांजन भाळी |
शुळी वेष्टित सुरवर किन्नर ते काळी |
हाटकवर्णा नाटक करुणा कल्लोळी || १ ||
जयदेवी जयदेवी जय वेदमाते |
आरती ओवाळू तुज कृपावंते || धृ ||
हंसाननं जगजीवन मनमोहन माता |
पवनाशन चतुरानन थक्कीत गुण गाता |
अमृतसंजीवनी अंतर सुखसरिता |
दासा पालन करिता त्वरिता गुणभरिता || २ ||
 
******************
 
देवी अंबाबाई नवरात्रीची आरती
 
 
अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनी हो ॥
मूलमंत्र जप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रम्हाविष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो ॥१॥
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥धृ॥
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो ।
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळोनी हो ॥२॥
तृतीयेचे दिवशी अंबे श्रृंगार मांडीला हो ।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥३॥
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।
उपासका पहासी प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपे पहासी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो ॥४॥
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
आर्धपाद्य पुजनें तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समई करिती जागरण हरि कथा हो ।
आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रिडता हो ॥ ५ ॥
षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो
घेवुनी दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो ।
जोगवा मागता प्रसन्न झाली मुक्ताफळा हो ॥ ६ ॥
सप्तमीचे दिवशी सप्तश्रृंग गडावरी हो ।
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाईजुई शेवंती पूजा रेखीयली बरवी हो ।
भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचेवरी हो ॥ ७ ॥
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्री पर्वती उभी पाहिली जगत्जननी हो ।
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो ।
स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो ॥ ८ ॥
नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो ।
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुनी हो ॥९॥
दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो ।
सिंहारुढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुभंनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तव चरणी हो ॥१०॥
 
 
******************
महिषासुरमर्दिनी आरती
 
 
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी|
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी|
वारी वारी जन्म मरणाते वारी|
हारी पडलो आता संकट निवारी ||१||
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी |
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ||ध्रु.||
त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही|
चारी श्रमले परंतु न बोलवे काही |
साही विवाद करिता पडिले प्रवाही|
ते तू भक्त्ता लागी पावसि लवलाही || जयदेवी जयदेवी || २||
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा|
क्लेशा पासुनि सोडवि तोडी भवपाशा |
अंबे तुज वाचून कोण पुरविल आशा |
नरहर तल्लिन झाला पदपंकज लेशा || जयदेवी जयदेवी ||३||
******************

अवतारांच्या व अन्य आरत्या

देवाधिदेव
 
जय देव जय देव देवधिदेवा |
आरती ओवाळू भाबड्या भावा ||धृ.||
बहु देवी देव एकचि हा पाहा|
पाहा नचि निरसोनी राहा ||
राहे पाहा म्हणणे शब्दलेश हा|
लेश जाता आपे आपणाते पाहा ||१||
भावाभाव जेथे निरसोनी गेला |
गेला म्हणता तेथे शब्दचि ठेला |
ठेला गेला हा शब्द जेथे निमाला |
तेथे रामदास रामचि जाला || २ ||
******************
मत्स्यावतार
 
जय जय मच्छदेवा जय जय मच्छदेवा|
कैसी करावी तुझी भक्ती सेवा ||धृ.||
मच्छपुराण ऐकावी तैसे मनि धरावे ||१||
अनंतरूपी नारायण | महिमा जाणेसा कवण || २||
दास म्हणे मच्छमोठा| मारी शंखाला चपेटा ||३||
******************
कुर्मावतार
 
जय जय कूर्मराया जय जय कूर्मराया|
सकळ सुष्टीची तुजलागी माया ||
पृथ्वी रसातळा जाता | तुवा राखिली भगवंता ||१||
दास म्हणे नानापरी | तुझे मन दिनावरी ||२||
 
******************
वराहावतार
जय जय वराहो जय जय वराहो |
तुझे ध्यान माझे अंतरी राहो ||धृ.||
ऐको वाराहपुराण | तैसि धरू आठवण || १||
मृत्यू येता चुकविली | समई मोठा धीर दिल्हा |
देवभक्तांचा सांभाळ | करीतसे सर्वकाळ ||२||
 
******************
नरसिंहावतार आरती 1
 
जय जय जय जय जय सामराजा |
अकांती पावला देव भक्तकाजा ||धृ.||
लक्ष्मीनृसिंह नित्य नामे जेथे |
भूतपिशाच्ये काये करील तेथे || १||
उग्र बहुत नृसिंह उपासना |
लोभे सांभाळिले देवभक्त जना ||२||
भक्त गांजिता साहवेना अंतरी |
दासाचा कोवसा देव धावणी करी ||३||
******************
नरसिंहावतार आरती 2
 
जय जय सिंहरूपा जय जय सिंहरूपा|
भक्तावरी देवा तुझी पूर्ण कृपा || धृ.||
प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार|
जानुवरि चिरियला निशाचर ||१||
भक्त कुडावया स्वामी नरहरी|
रामदास म्हणे आता पाव झडकरी ||२||
 
******************
नरसिंहावतार आरती 3
 
जय देव जय देव जय सिंहवदना |
आरती ओवाळू सेवक सुखशयना ||धृ||
हरिभक्त देखोनी दुःख दुर्जना |
चांडाळ ते पापी देखो न शकती सज्जना|
प्रह्लाद गांजीला केली यातना|
पाहवेना साहवेना देवा राहवेना ||१||
तटतटिला स्तंभ कडकडिल्या ज्वाळा |
तडतडिल्या पडल्या नक्षत्र माळा |
घडघडिले पर्वत कल्पना वेळा |
थोर हलकल्लोळ जाळा विधिगोळा ||२||
पिंगट जटा जिव्हा कडकडिल्या दाढा |
धगधगले लोचन गडगडिला गाढा |
खणखणती शस्त्रे वोढ्या वरि वोढा |
पछाडिले रजनीचर केलासे रगडा ||३||
चर चर चर उदर फाडी विभांडी |
तर अंतरमाळा वोढोनी काढी |
धर धर पोटी आवेश क्रोध भडाडी ||४||
देवभक्तांचा कैवारी साचा |
गजा गंडस्थळी चपेट सिंहाचा |
तो हा नर केसरी न बोलवे वाचा|
सौम्य जाला नरहरी स्वामी दासाचा ||५||
 
******************
नरसिंहावतार आरती 4
 
जय जय नरसिंह्या | जय जय नरसिंह्या ||
अकळ न कळे तुझा पार सिंह्या |
भक्तवछळ दीन वछळा हरी|
प्रल्हादासि रक्षिले नानापरी ||१||
भावार्थ प्रल्हादभक्तें दाखविला |
त्याच्या भावार्थे स्तंभी प्रगट जाला ||२||
हरिजनांच्या व्देशी मारीयेला |
दास प्रल्हाद देखे सुखी केला ||३||
 
******************

वामनावतार
 
जय जय वामना रे जय जय वामना रे |
कृपाळुपणे पुरवी कामना रे ||धृ.||
इंद्रे बाहिले भगवंतासि रे |
लघुरुपेची राखिले तयासी रे || १||
बळि घातला तो पाताळी रे |
इंद्र राखिला तो काळि रे ||२||
दास तनु मनु घेत सेवा मनु |
धन्य भक्तपाळु नारायणु || ३||
******************
परशुरामावतार
 
जय जय भार्गवा रे जय जय भार्गवा रे |
तुज करिता खोटा मार्ग बा रे ||धृ.||
नष्ट क्षेत्री निर्दाळिले| भले ब्राह्मण पाळिले ||१||
सहस्त्रार्जुनाचा संव्हार| फेडियेला भुमिभार ||२||
दास म्हणे रे सरस | हाती घेतला फरस ||३||
******************
रामावतार
 
जय जय दिनबंधु जय जय दिनबंधु |
पतित पावन कृपासिंधू || धृ ||
देव पावले बंधन| मुखे करिती चिंतन ||१||
भवबंधन छेदिले| सुरवरा मुक्त केले ||२||
रामदासाचे मंडण| राम पुण्य परायण || ३ ||
 
******************
कृष्णावतार
 
जय जय यादवा रे जय जय यादवा रे|
तुझे ध्यान लागले माधवा रे || धृ ||
होसी भक्तांचा कोवसा | भवार्णवी भरवसा ||१||
भार फेडीला महीचा| कैवारी तू पांडवांचा ||२||
दास म्हणे मनोहर | कृष्ण आठवा अवतार ||३||
 
******************
बौद्धावतार
 
जय जय बोध्यरूपा जय जय बोध्यरूपा|
काय पहावे आता तुझिया स्वरूपा ||धृ||
लोक अवघेची बुडाले| तुवा डोळेचि झाकिले ||१||
काही घडे ना उपाये| अवतरोनि केले काये || २||
लोकी काये आठवावे | किती म्हणोनि निवडावे ||३||
देव आहे तैसा नाही| आधार न दिसे काही ||४||
कृपाळु तो वैरी जाला| आवघा तमासा पहिला ||५||
न्यायनिती बुडाली| बरी आठवण केली ||६||
दास म्हणे कैचा धीर | देव जाहाला बधीर ||७||
******************
 
कलंकी अवतार
 
जय जय कलंकी देवा जय जय कलंकी देवा |
सकळा सेवटी तुझा मोठा उठावा ||धृ||
जिकडे तिकडे तुझा वावरे घोडा|
तयासि पाहता कोठे न दिसे जोडा ||१||
सकळ यवनाचा नास | तोडु लाग लाघसाच ||२||
चौताळ लमके वरी | देव काढिले बाहेर |
दास म्हणे हा सेवटी| म्लेंछा करील कुटाकुटी || ४ ||
 
******************
सूर्य आरती
 
जय जय सूर्यराज जय जय सूर्यराज |
उपासना गुणे सूर्यवंश माझा ||धृ.||
धगधगीत सुर्य ऐसी उपमा देती|
उदंड आले गेले तोचि आहे गभस्ति ||१||
असंभाव्य तेज प्रगट प्रतापे जातो|
तयासि देखता चंद्र भगवा होतो ||२||
अतुल तुळणा नसे सूर्यमंडळा |
उपासनेमध्ये सूर्यवंश जिव्हाळा ||३||
दास म्हणे त्यास काये आता तुळावे |
जैसे आहे तैसे सकळ जनाला ठावे ||४||
 
 
******************
 
नागेश आरती
 
जय देव जय देव नागेशा |
आरती ओवाळू तोडू भवपाशा ||धृ.||
मही धरूनी माथा ऐसे तू जाणे |
शंकर कंठी मिरवी तूझे भूषणे ||
सकळांचा विश्वास तुजपाशी जाणे |
म्हणोनी अमृत कुंडे ठेवी रक्षणे ||१||
सूर्याच्या रथाचे वारू जाउनि लंकेसी|
निळे करोनि सत्य दावी मातेसी|
ऐसा प्रताप तुझा कळला देवासी |
म्हणोनी अखंड नामे भजतो नागेशी ||२||
मार्गेश्वर पंचमीशी तू पाव |
तुझे नामे लोक करिती उत्सव ||
प्रसन्न होउनि त्यांचा पुरवीसी निर्वाह |
तुझे चिंतन केलिया दासा निज बोधी वाव ||३||
 
 
******************

श्री ज्ञानेश्वर महाराज
 
जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा |
मंगल आरति करतो दे स्वपदी ठेवा ||धृ||
कलियुगी त्रासुन गेले सज्जन भवउष्णे|
ते समयी अवतारा घेउन श्रीकृष्णे|
तोषविले सज्जन ज्या नानाविध प्रश्ने |
तेणे निरसुन गेली अज्ञान तृष्णे ||१||
गीतादेवी केली सोपी सकळाला|
निर्जरगुरू परिसुनिया घोटिति मुखलाळा|
टीकारुपी घालुन दासाला माळा |
तेणे छेदुन नेली अज्ञानज्वाळा ||२||
करिता वाद व्दिजांसी रेडा बोलविला |
विप्रांचा गर्वनिधी तेणे घालदिला|
अज्ञानांधकार ज्ञाने घालविला |
ब्रह्मज्ञाने मत्सरदीप मालविला ||३||
दासाचा सारथि तू म्हणुनी मी तुजला|
बाहता दीन दयाळा न पवसि का मजला |
नुल्लंघिसि का माते अज्ञविपिनि मजला|
दास म्हणे मम जिव हा तद्योगे बुझला ||४||
******************
 
श्री गुरू नरसिंह सरस्वती आरती
 
आरती दत्तात्रेयप्रभूची | करावी सद्भावे त्याची ||धृ||
श्रीपद कमला लाजविती | वर्तुळ गुल्फ रम्य दिसती|
कटिस्थित कौपिन ती वरती| छाटी अरुणोदय वरिती ||
वर्णु काय तिची लीला | हीच प्रसवली|
मिष्टान बहु| तुष्टाचि झाले|
ब्रह्मक्षत्र आणि वैश्य शूद्रहि सेवुनिया जीची|
अभिरूची सेवुनिया जीची ||१||
गुरुवर सुंदर जगजेठी | ज्याचे ब्रह्मांडे पोटी|
माळा सुविलंबित कंठी | बिबफळ रम्यवर्ण ओष्ठी ||
अहा ती कुंदरदन शोमा | दंड कमंडलु | शंख चक्र करि |
गदा पद्म धरि || जटामुकुट परि शोभतसे ज्याची ||२||
रुचिरा सौम्य युग्म दृष्टी | जिणे व्दिज तारियेला कुष्ठी|
दरिद्रे ब्राह्मण बहुकष्टी | केला तिनेच संतुष्टी |
दयाळा किती म्हणुनी वर्णू | वंध्यावृंदा तिची सुश्रध्दा |
पाहुनि विबुधाचि | पुत्र रत्न जिस देउनिया सतीची|
इच्छा पुरविली मनीची ||३||
देवा अघटित तव लीला | रजकही चक्रवर्ती केला|
दावुनि विश्वरूप मुनीला | व्दिजोदरशूळ पळे हरिला|
दुभविली वांझ महिष एक | निमिषामाजी|
श्रीशैल्याला | तंतुक नेला| पतिता करवी वेद वदविला |
महिमा अशी ज्याची ||४||
ओळखुनी क्षुद्रभाव चित्ती | दिधले पीक अमित शेती |
भुसुर एक शुष्क वृत्ती | क्षणार्धे धनद तया करिती ||
ज्याची अतुल असे करणी| नयन झाकुनी | सर्व उघड़िता|
नेला काशीस भक्त पाहता | वार्ता अशी ज्याची|
स्मरा हो वार्ता अशी ज्याची ||५||
दयाकुळ औदुंबर मूर्ती | नमिता होय शांत वृती|
न देती जन्ममरण पुढती | सत्य हे न धरा मनि भ्रांती|
सनातन सर्वसाक्षी ऐसा | दुस्तर हा भव निस्तरावया |
जाउनि सत्वर | आम्ही सविस्तर पूजा करू त्याची |
चला हो पूजा करू त्याची ||६||
तल्लीन होउनी गुरूचरणी | जोडूनि भक्त राजपाणी|
मागे हेच जनकजननी | अंती ठाव देई चरणी ||
नको मज दुजे आणिक काही| भक्तवत्सला |
दीनदयाळा परमकृपाळा|| श्रीपदकमळा दास नित्य याची |
उपेक्षा करू नको साची || ७ ||
******************
 केदार आरती
 
भागीरथी मूळ सितळ हिमाचळवासी |
न लगत पळ दुर्जन खळ संहारी त्यासी |
तो हा हिमकेदार करवीरापाशी |
रत्नागिरीवरी शोभे कैवल्यराशी || १ ||
जयदेव जयदेव जयजय केदारा |
दासा संकट वारा भवभय अपहारा || धृ ||
उत्तरेचा देव दक्षिणे आला |
दक्षिण केदारसे नाम पावला |
रत्नासूर मर्दोनी भक्ता पावला |
दास म्हणे थोर दैव धावला || २ ||
******************
श्री भगवद्गीता आरती
जय देवी जय देवी भगवद्गीते |
आरती ओवाळू अध्यात्म सरिते ||धृ.||
कुरुक्षेत्री कौरव पांडव मिळाले |
उभयदळी ते ही शंख वाजविले ||
युध्द समयी पार्थे सर्वही लक्षियले |
भीष्म द्रोण देखुनि मन कंटाळले ||१||
अर्जूनासी मोह उत्पन्न झाला |
सांख्यमते त्याचा कृष्णे निरसीला|
अष्टादशाध्यायी गीता उपदेश केला|
युध्दालागी पार्थ मग सिध्द झाला ||२||
श्रीकृष्णाचे वदनी कन्या जन्मली|
भगवद्गीता म्हणोनि नाम पावली|
श्रवणे पठणे पतित उध्दरती|
पुष्पकात घालुनी वैकुंठा नेती ||३||
एकनिष्ठे प्राणी भगवद्गीतेस |
पारायण करिता तो पावे भाग्यास ||
अंति सायुज्जता पावे मुक्तीस |
त्याला देखुनि कंप सुटे यमास ||४||
श्लोक श्लोकार्धासि नित्य उच्चारी|
प्राणी तो कदापि न पडे अंधारी ||
त्याचे सन्निध नित्य राहे मुरारी|
दास म्हणवोनि ध्यातो अंतरी ||५||
******************

कृष्णा नदी आरती
 
सुखसरिते गुणभरित दुरिते निवारी |
निःसंगा भवभंगा चिद्गंगा तारी ||
श्रीकृष्णे अवतार जलवेषधारी|
जलमय देहे निर्मल साक्षात हरी ||
जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे |
आलो तुझिया उदरा निरसी मम तृष्णे || जयदेवी जयदेवी ||१||
हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले|
प्रेमानंदे बोधे मिळणी मीळाले
ऐशिया संगमी मिसळोनि गेले|
रामदास त्यांची वंदी पाऊले | जयदेवी जयदेवी ||२||
 
******************
 
सर्वभक्त आरती
 
सनकादिक सनत्कुमार सनक सनंदन नारद |
तुंबर अंबरीष भीष्म प्रल्हाद|
बळी पृथु आर्षभ ध्रुव उपमन्यु रुक्मांगद |
आश्वीनीकुमार गजेंद्र प्रसिध्द ||१||
जयजयजय आरती भक्त सुखमूर्ती |
प्रेमभावे अव्यक्त आणियले व्यक्ति|
वैराग्यभास्कर सहज निज शांती|
ज्ञानघन पूर्ण स्वयंबोध स्थिति ||धृ||
रूद्र विभीषण गुहक याज्ञवल्की आणि जनक|
पिंगळा उद्भव अक्रुर पार्थ परीक्षिति शुक |
वसुदेव विदुर कुब्जा सुदामा पुंडरीक |
नाथ गोपीचंद निकट सेवक ||२||
निवृत्ति सोपान ज्ञानेश्वर मुक्ताबाई चांगदेव |
दोघे सुरदास रामदास पाहो |
विमळानंद सुखानंद मिराबाई सद्भाव |
धना सेना कबीर परमानंदमेहो ||३||
पंपादास सजन कृष्णचरचरी|
तुलसी नामा नारा विव वांसुरी|
जसवंत गंगल पाठक मुद्गल नरहरी |
खेचर जोगा नागा माष्टा बहिरो डिंगरी ||४||
अलखिदास जाल्हण मानदास रेणुकानंदन |
कान्हुपात्रा कूर्मदास अंता गोरा धुंडिजनार्दन |
केशवदास चांगा परसोवा नायक पद्मन |
काको सुदामा सावता अच्युत एकोजनार्दन ||५||
अवधूत रामानंद माधवदास |
रोहीदास चोखा बंका जनका सेवेस |
आणिक जाले होती आरती तयास|
रमा गरूड जय विजय निजदास ||६||
एक आरति करिता भक्तांचे वोळी |
तेणे सहस्त्र आरत्या केल्या वनमाळी |
बाळका पूजिता जेवि जननी तोषली|
रामीरामदास भावे ओवाळी || ७ ||
 
 
******************
आत्माराम आरती
 
नाना देही देव एक विराजे |
नाना नाटक लीला सुंदर रुप साजे ||
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव मति माजे|
अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे || १||
जय देव जय देव जय आत्मारामा|
निगमागम शोधिता नकळे गुण सीमा ||ध्रु.||
बहुरुपी बहुगुणी बहुता काळांचा |
हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ||
युगानुयुगी आत्माराम हा आमुचा|
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ||२||
 
 
******************
 
श्री क्षेत्रपाल
 
नाना क्षेत्रे पाळक चाळक सृष्टीचा |
वोळे घन आनंदाचे वृष्टीचा |
संकटमोचन देव कृपादृष्टीचा |
कैपक्षी सामर्थे भक्त पुष्टीचा || १ ||
जयदेव जयदेव जय क्षेत्रपाळा |
आरती ओवाळू तुज रे गोपाळा || धृ ||
त्रिशुल डमरू सिंगी योगी वितरागी |
अभिनव महिमा न कळे भोगी ना त्यागी |
दर्शनमात्रे सेवक होती विभागी |
सर्वांभूती पहा या देवालागीं || २ ||
चळवळ चळवळ जिकडे तिकडे देवाची |
अगणित महिमा कोणी लिही ना वाची |
का रे काही सेवा न करे फुकाची |
दास म्हणे बुद्धी न करावी काची || ३ ||
 
 
******************
श्री मंगेश
 
उपमा नाही रुपी निर्गुण गुणरहिता |
कैलासाहूनी मानस धरिला भजकर्ता |
काशी आदी करूनी गणनाच्या तीर्था |
लिंगदेहे वससी भक्तीभावार्था || १ ||
जयदेव जयदेव जय अजिनांबर धारी |
आरती तुज मंगेशा निर्गुण उपचारी || धृ ||
गजचर्म परिधान शशी धरिला शिरी |
भूधर जिंकुनी कंठी केली उत्तरी |
जटाजूट वसे गंगा सुंदरी |
वाहन नंदी तुझे अर्धांगी गौरी || २ ||
मंगलदायक तुझे शिवनाम घेता |
तत्क्षण भस्म होती तापत्रय व्यथा |
अभिन्न भिन्न भाव दासांच्या चित्ता |
चरणविरहित न करी मज गौरिकांता || ३ ||
 
 
******************
 
कल्याण कृत समार्थाची आरती
 
साक्षात शंकराचा | अवतार मारुतीचा |
कळी मध्ये ते चि जाले | रामदासाची मूर्ती ||१ ||
आरती रामदासा | भक्त विरक्तईशा |
वीस ही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला |
जडजीवा उद्धरले | नृप शिवाजी तारिला || २ ||
ब्रम्हचारी व्रत ज्याचें | रामरूप सृष्टी पाहे |
कल्याण तिहीं लोकीं | समर्थ सद्गुरुचे पाय || ३ ||
 
******************

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती