राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी अशोक चव्हाण बोलत होते. याशिवाय, मराठा आरक्षण टिकण्यासाठी जे आवश्यक ते केलं जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठा आरक्षणावर ८ मार्चला सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी केंद्रराने सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. आमचे वकील मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया हे देखील बैठकीला उपस्थित होते. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. केंद्राने सकारात्मक भूमिका घ्यावी यावर ते सकारात्मक होते. जमल्यास मी केंद्राशी बोलेन, असं देखील फडणवीस यांनी सांगितल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.