उत्तरांचलमध्ये असलेल्या हरिद्वारने गांधीजींना 'महात्मा' ही पदवी दिली. उत्तर प्रदेश माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित झालेल्या 'उत्तर प्रदेश' आणि डॉ. कृष्ण कुमारद्वारा संपादीत 'सहारनपुर संदर्भ' या पुस्तकानुसार स्वामी श्रद्धानंदजी यांनी सर्वप्रथम गांधीजींना 'महात्मा' या नावाने संबोधले. तेव्हापासून गाधीजींना महात्मा गांधी असे म्हटले जाऊ लागले.
गांधीजींना महात्मा ही पदवी 1915 मध्ये त्यांच्या हरिद्वार प्रवासादरम्यान गुरूकुल कांगडी येथे स्वामी श्रद्धानंद यांनी दिली होती. 8 एप्रिल 1915 रोजी गांधीजी गुरूकुल कांगडी येथे संत महंतांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी स्वामी श्रद्धानंद यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गांधीजींच्या कार्याची स्तुती करत स्वामींनी त्यांना महात्मा या पदवीने गौरविले होते.
1985 मध्ये प्रकाशित झालेल्या सहारनपूर संदर्भानुसार स्वामी श्रद्धानंद गांधीच्या सत्याग्रह आंदोलनाने प्रभावित झाले होते. गांधीजींना पाठिंबा देताना त्यांच्या आंदोलनाला धर्मयुद्धाची उपमा दिली होती. या धर्मयुद्धात आपणही सहभागी असल्याचे लिखित प्रतिज्ञापत्र त्यांनी गांधीजींना पाठवले होते. हरिद्वारचे गुरूकुल कांगडी स्वातंत्र्यसंग्रामाचे एक प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीशिवाय भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या नेत्यांनीदेखील गुरूकुलामध्ये येऊन स्वातंत्र्य संग्रामाची रणनीती आखली होती.
'उत्तर प्रदेश' या पुस्तकात गांधीचे प्रमुख गांधीवादी लेखक रामनाथ सुमन आहेत. या पुस्तकात गांधींचा हरिद्वार प्रवास आणि गुरूकुल भ्रमणाचा उल्लेख आहे.
याशिवाय 1933 मध्ये सत्यदेव विद्यालंकारद्वारा प्रकाशित 'स्वामी श्रद्धानंद' या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 372 वर स्वामीजींनी पहिल्यांदा गांधीजींना महात्मा म्हणून पुकारल्याचा उल्लेख आहे. गांधीजींनी आत्मचरित्रात स्वत: लिहले होते की स्वातंत्र्य आंदोलनात काय करावे किंवा भविष्यात कोणती रणनीती आखावी याची प्रेरणा त्यांना हरिद्वार येथे 1915 मध्ये आयोजित एका कुंभमेळ्याप्रसंगी संत-महंतांकडून मिळाली होती.
एवढेच नाही तर दिवसातून केवळ पाच पदार्थांचे सेवन करण्याचा संकल्प त्यांनी हरिद्वार येथे केला होता. कुंभमेळ्यातील उपवासादरम्यान हा संकल्प केला होता. यामध्ये पाण्याचा समावेश नव्हता. तेव्हा स्वामी श्रद्धानंदाने महात्मा गांधी एक महान पुरूष बनतील अशी भविष्यवाणी केली होती.