मधुकरराव पिचड यांचे पुत्र राष्ट्रवादीचे आ. वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश निश्चित

शनिवार, 27 जुलै 2019 (09:12 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे पक्षाकडे पाठविले आहेत. आज दिलेल्या राजीनामासत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या राजीनामासत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ. वैभव पिचड यांनी भेट घेतली. त्यानंतर पिचड यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक उधाण आले आहे. त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्‍चित मानला जाऊ लागला आहे. त्यांचे समर्थक असलेल्या अकोले तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे पदाचे राजीनामे सोपवले आहेत. याला पक्षाच्या नेत्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. आजच्या राजीनामासत्रामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तालुकाध्यक्ष गिरीजाजी जाधव, युवक तालुकाध्यक्ष अध्यक्ष शंभू नेहे व इतरांचे राजीनामे आले आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र जाता भाजपात जाणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मधुकर पिचड हे दलित नेते म्हणून राज्यभर ओळखले जातात. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पदही भूषविले आहे. त्यांच्या पुत्राच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला असून त्यांच्या समर्थकांनी पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती