येणार तर युतीचंच सरकार, असं म्हटल्यावर सर्वाधिक टाळ्या देवेंद्र फडणवीस यांनी वाजवल्या आहेत तर मीसुद्धा नरेंद्र मोदींसमोर त्यांच्याकडून (फडणवीस) सर्वाधिक टाळ्या वाजवून घेतल्यात या कोपरखळ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आशिष शेलार, राहुल शेवाळे, मनोज कोटक यासारखे नेते उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की पंतप्रधानांना मी प्रश्न विचारला किती गोष्टींसाठी आपलं अभिनंदन केले पाहिजे, याच ठिकाणी प्रचारसभा झाली होती, तेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं होतं की काश्मीरमधील कलम 370 रद्द करु. विरोधक सांगत होते, की 370 हटवणार नाही. मात्र मोदींनी ते प्रत्यक्षात आणलं, याचा मला अभिमान आहे, असं ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव पुढे म्हणाले की नुसत्या घरातल्या घरात उठाबशा काढून, बेडक्या फुगवून दाखवायच्या नाही आहेत. ही ताकद योग्य ठिकाणी आपण सर्वानी वापरली पाहिजे . आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने विकासाला दिशा देणारं नेतृत्व मिळालं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
ठाकरे म्हणाले की येणार तर युतीचंच सरकार, असं म्हटल्यावर सर्वाधिक टाळ्या देवेंद्र फडणवीस यांनी वाजवल्या आहेत. आणि मीसुद्धा नरेंद्र मोदींसमोर त्यांच्याकडून सर्वाधिक टाळ्या वाजवून घेतल्या असून, युती आहे आणि करायचं तर दिलखुलासपणे. आम्हाला सत्ता हवी आहे, पण सत्तेची हाव नाही, तर राज्याचा विकास करण्यासाठी हवी. एक चांगल सरकार मित्रपक्षांसह हवं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.