नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर टीका केली. पाकिस्तानची मी स्तुती केल्याचे ते बोलले. वास्तविक पाहता ‘पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सत्ताधारी आणि सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात. भारताविरोधात वातावरण तयार करतात, असे मी म्हणालो.
आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी इथं सांगतात मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे?
१९६७ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी मी पहिल्यांदा निवडून आलो. ७ वेळा संसद व ७ वेळा विधिमंडळात गेलो. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी अपयश येऊ दिले नाही. जो माणूस सतत ५२ वर्षे एकही दिवसाची सुटी न घेता काम करतो, त्याच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी आपली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. मुख्यमंत्री फडणवीस नाशिकला काय बोलले त्याने फरक पडत नाही. कारण ते काहीही बोलू शकतात. कारण नागपूरचे त्यांच्यावर संस्कारच हे आहेत. त्यामुळे हे फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय, ते काय बोलणार हे सांगायची गरज नाही. पण पंतप्रधानांनी असे बोलण्याची काही गरज नव्हती.
ते काहीही बोलण्याइतके कर्तृत्ववान आहेत. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मलाही बोलता येतं. पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक इन्स्टिट्यूशन आहे. हे पद या देशाच्या लोकशाहीमधील महत्वाचं पद आहे. या पदाची मला किंमत ठेवायची आहे. या पदाची मला अप्रतिष्ठा होऊ द्यायची नाही. हे मी मुद्दाम सांगतो.खुशाल सांगताहेत मी पाकिस्तानची स्तुती केली. एकेकाळी मी या देशाचा संरक्षणमंत्री होतो. संरक्षणमंत्र्याला पाकिस्तान काय, चीन काय हे सगळ्यात जास्त समजतं. भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे अध्यक्ष आणि या पक्षाचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी..... अटलबिहारी वाजपेयी गेल्यानंतर भाजपचा एक नंबरचे नेते आडवाणी ओळखले जात होते. मोदी लाहोरला जाऊन आले. तेव्हा आडवाणी यांनी पत्रक काढलं. ‘मोदीका लाहोर दौरा एक सार्थक कदम. दोनो देशोंकी मित्रता आगे बढे. मै यही चाहता हू.’ असे आडवाणी म्हणताहेत. म्हणून गेलं कोणं, अन् बारामतीकरांचं नाव. हे बरोबर नाही. एक म्हण आहे ना. करून गेला अमूक अमूक अन् भलत्याचंच नाव. माझी पंतप्रधानांना विनंती आहे. जरा माहिती घ्या. पूर्ण माहिती घ्या. नंतर असा गोष्टींच्या बद्दल बोलण्याची भूमिका घ्या.