प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही ! -उद्धव ठाकरे

“लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, अशा शब्दात भाजपाला सूचक इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचेच दर्शवून दिले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशाराही दिला आहे.
 
विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळवत सत्ता स्थापनेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेले आहे. त्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत देत भाजपाला कोंडीत पकडले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती