घराणेशाहीला कौल

वेबदुनिया

गुरूवार, 22 ऑक्टोबर 2009 (14:05 IST)
या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकिटे वाटली होती. त्यावरून वादंगही झाला होता. पण आता यातले बव्हंशी उमेदवार विजयी झाल्याने त्यांना जनतेनेही साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख लातूरमधून विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव नांदगाव मतदारसंघातून विजयी झाले असून स्वतः भुजबळही येवल्यातून विजयी झाले आहेत. भुजबळांचे पुतणे समीर काही महिन्यांपूर्वीच खासदार झाले होते. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजाही परळीतून विजयी झाली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती सोलापूरमधून विजयी झाल्या आहेत. यापूर्वी शिंदे यांच्या पत्नी सोलापूरमधून आणि जावई मुंबईतून पराभूत झाले होते. त्यामुळे मुलीच्या निमित्ताने प्रथमच शिंदेंची पुढची पिढी राजकारणात यशस्वी ठरली आहे. तिकडे अमरावतीत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावतही विजयाकडे मार्गक्रमण करत आहेत.

पण सर्वच घराण्यांना लोकांनी महत्त्व दिले असे मात्र नाही. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन मात्र मनसेच्या राम कदम यांच्याकडून पराभूत झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा