अमराठी मतदार ठरवणार पुढचा मुख्यमंत्री?

मराठी माणसांचा खरा कैवारी कोण हे ठरविण्याच्या संघर्षात मराठी मतांचे विभाजन झाल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री अमराठी मतदार ठरविणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. म्हणूनच मराठी मते एकगठ्ठा आपल्यालाच मिळावीत यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोहोंनीही कंबर कसली आहे. या दोन्ही पक्षाचे मुख्य प्रभाव क्षेत्र मुंबई आणि ठाणे असल्याने या दोन जिल्ह्यात मराठी मतांचे विभाजन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते.

राज्यात सत्तेवर कोण येणार हे २८८ मतदारसंघ ठरविणार असले तरीही सत्तेची दोरी खर्‍या अर्थाने आहे ती मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यांकडे. या दोन जिल्ह्यांत मिळून विधानसभेच्या साठ जागा आहेत. या दोन जिल्ह्यातच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे मनसेने धक्का दिल्यास शिवसेना-भाजप युतीचे शिवशाही साकारण्याचे स्वप्न चक्काचूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यावरच दोन्ही पक्ष भर देत आहेत. त्याचवेळी अमराठी मतदारही या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत.

विधानसभेच्या मुंबईत ३६ आणि ठाणे जिल्ह्यात २४ जागा आहेत. या दोन्ही ठिकाणी सुरवातीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व होते. शिवसेनेने सत्तेची चव पहिल्यांदा ठाणे महापालिका जिंकूनच चाखली होती. मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले झाले होते. पण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेतला आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीतही आले.
कल्याणची एकमेव जागा वगळता शिवसेनेचे मुंबई आणि ठाण्यातील उमेदवार मनसेने खेचलेल्या मतांमुळे पडले. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून शिवसेनेने मराठी मतांचे खरे दावेदार आपणच असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात तरी प्रचार मराठी माणूस या मुद्याभोवतीच केंद्रीत राहिला. राज यांनीही आक्रमकपणे हा मुद्दा मांडला, पण शिवसेनेने हा मुद्दा आमचाच असे सांगत मनसेचा उल्लेख 'दलाल' 'सुपारीमॅन' असा केला. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत या मुद्याचा 'बाप मीच' असल्याचे आवर्जून सांगितले होते.

त्यामुळे मराठी मतांसाठीची लढाई तीव्र झाली असून मंगळवारी प्रत्यक्ष मतदानात त्याचे काय प्रतिबिंब उमटते ते पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा