अखेर कलावतीने मागे घेतली उमेदवारी

मंगळवार, 29 सप्टेंबर 2009 (15:21 IST)
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमांच्या केंद्रस्थानी असलेल्या कलावती बांदुरकर या विधवा शेतकरी महिलेने वणी मतदारसंघातील आपली उमेदवारी मागे घेतली आहे. कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांच्यामुळे कलावतीला मदत मिळाली होती. त्यावर पाणी सोडावे लागेल, या भीतीने कलावतीने हा निर्णय घेतला, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. या समितीनेच कलावतीला उमेदवार म्हणून उभे केले होते.

कलावती निवडणुकीत उभी रहाणार असे वृत्त आल्यानंतर तिला मदत देणार्‍या सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अर्ज भरायचा की नाही, या द्वंद्वात कलावती अडकली होती. या ताणामुळेच तिच्या छातीतही दुखले होते. म्हणून तिला रूग्णालयातही दाखल केले होते. तरीही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिने रूग्णवाहिकेतून येत अर्ज भरला होता. आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मात्र तिने अर्ज मागे घेतला.

वेबदुनिया वर वाचा