राज ठाकरेंचा 'वचकनामा' जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराच्या अंतिम दिवशी आपल्या पक्षाचे निवडणुकीनंतरचे धोरण 'वचकनामा' म्हणून जाहीर केले. कॉंग्रेसचा जाहिरनामा, शिवसेना-भाजपचा 'वचननामा' या पार्श्वभूमीवर सरकारवर वचक ठेवण्यासाठी राज ठाकरेंचा 'वचक'नामा लक्षवेधी ठरला आहे. या वचकनाम्यात मराठीचा मुद्दा तर आहेच, शिवाय आधुनिकीकरणाचा कास धरताना संगणकावर युनिकोडचा वापर करून मराठीचा वापर सर्वदूर करण्यावर भर देण्यात आला आहे. शिवाय दहावीपर्यंत शिक्षण सक्तीचे करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

या वचकनाम्यात खाजगी, सार्वजनिक, संघटीत किंवा असंघटीत क्षेत्रात मराठी भाषिकांना रोजगार दिला जाईल व रोजगार दिला जात आहे की नाही याकडे मनसेकडून लक्ष दिले जाईल असे म्हटले आहे. राज्यात कोणतीही अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत व परप्रांतियांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी कायदा केला जाईल. पोलिस व राज्य कर्मचारी यांना हक्काची घरे मिळावून देण्यासाठी स्वतंत्र मंडळे स्थापन केली जातील. उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मराठी मुलांनाच प्राधान्य दिले जाईल. विजनिर्मितीसाठी नवीन प्रकल्प राबवून, विजचोरी प्रकरणी कडक कायदे केले जातील. शेतकऱ्यांना मुबलक दरात बी-बीयाणे, खते, औषधे दिली जातील.

मनसेने आपल्या वचकनाम्यात दहावीपर्यंत मराठीचे शिंक्षण अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. संगणकावर "युनिकोड'चा वापर करुन राज्यात सर्वंदूर संगणकावर मराठी भाषा वापरली जाण्यासाठी प्रयत्न केले जातील. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र सरकारकडे मराठीची बाजू मांडली जाईल.

वेबदुनिया वर वाचा