मुंबई आणि महाराष्ट्राचे युपी-बिहार घडविण्याचा तिथल्या नेत्यांचा डाव आहे. म्हणूनच मुंबईतला मराठी टक्का कमी होत हिंदी भाषकांचा टक्का वाढतोय. मुंबईत आज ७३ असलेले अमराठी नगरसेवक नंतर १५० होतील आणि मुंबईच्या या प्रकाराची आवृत्ती उद्या पुणे, नाशिक आणि औरंगाबादेतही होईल. राज्यातील आघाडीचे सरकार आणि शिवसेना-भाजप युती या दोघांनाही मराठी माणसाचे काहीही पडलेले नाही. दोन्ही नालायक आहेत, अशा शब्दांत त्यांचा उद्धार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी रात्री पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.
भांडूपमधील पक्षाचे उमेदवार शिशिर शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राज यांनी त्यांचे मुळचेच मुद्दे पुन्हा एकवार मांडून लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. मुंबईत पद्धतशीरपणे मराठी टक्का कमी होण्याचा प्रयत्न होतो आहे हे दाखवून देतानाच त्यांनी त्यासाठीची उदाहरणेही दिली. मुंबईत सध्या ७३ नगरसेवक अमराठी असून त्यांची संख्या पुढच्या निवडणुकीपर्यंत दीडशेपर्यंत जाऊ शकता असा धोक्याचा इशाराही दिला. त्यापुष्ट्यर्थ मुंबईतील लोकसंख्येचे गणितही समजावून सांगितले. १९९१ मध्ये मुंबईत ७१ टक्के असलेला मराठी भाषक २००१ मध्ये मात्र ६८ टक्क्यांपर्यंत खाली आा आहे. त्याचवेळी नऊ टक्क्यांपर्यंतचा उत्तर भारतीय समाज ११ टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे. पुढच्या शिरगणतीपर्यंत तो १७ ते २० टक्क्यांपर्यंत गेला असेल. बाहेरच्या राज्यातून येणार्या लोकांना पोसायचा ठेका काय फक्त महाराष्ट्राने घेतला आहे असा सवाल करून युपी-बिहारमधून येणारा भय्या येताना 'गरीब बिचारा' असतो. पुढे तो मतदारसंघ बांधतो आणि त्यातूनच त्यांचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार निवडून येतात. म्हणूनच ठाणे परिसरातून ३५ उत्तर भारतीयांना उमेदवारी द्या ही संजय निरूपम यांची मागणी जन्म घेते हे त्यांनी दाखवून दिले.
निरूपम यांना शिवसेनेने गेल्या वेळी बांद्र्यातून उमेदवारी दिली होती. दोनदा राज्यसभेवरही पाठवले. मग आता ते निवडून आल्यानंतर मराठी मते फुटल्याचा गहजब शिवसेना का करते असा सवालही केला. मराठीचाच मुद्दा असेल, तर मग उद्धव ठाकरे यांनी ज्या मतदारसंघात मतदान केले, तिथे फक्त शिल्पा सरपोतदार या मनसेच्या एकमेव उमेदवार मराठी होत्या. असे असेल तर उद्धव यांनी कोणाला मत दिले ते उघड करावे असे आव्हानही त्यांनी दिले. मराठी मते ही शिवसेनेने आपल्या गोठ्यातली दुभती गाय समजली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठी माणसासाठी राज्य सरकार काहीही करत नाही. आणि आपल्या राज्यातून बाहेर जाणार्या नागरिकांच्या कल्याणासाठी युपी-बिहारची सरकारे सर्वतोपरी प्रयत्न करतात हे त्यांनी बंदुकांच्या परवान्यांचे उदाहरण देऊन सांगितले. महाराष्ट्रात बंदुकीचा परवाना मिळवणे जिकीरीचे आहे. पण त्याचवेळी राज्यात सिक्युरीटी एजन्सीजमध्ये बहुतांश युपी-बिहारी दिसून येतात. त्यांच्या बंदुका असतात. त्यांचे परवाने त्यांच्या राज्यात तयार होतात आणि त्यांना ऑल इंडिया परमिटही असते, याकडे लक्ष वेधून मराठी तरूणांना हेच काम करण्यासाठी परवाने का दिले जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
राज यांनी यावेळी शिवसेना आणि उद्धव यांनाच टीकेचे लक्ष्य केले. बाळासाहेबांवर त्यांनी अजिबात टीका केली नाही. उलट बाळासाहेबांच्या मराठी प्रेमाविषयी कुणालाही कसलीही शंका घेता येणार नाही, असे सांगतानाच इतरांना मात्र मराठी की हिंदूत्व अशी थेट भूमिकाही घेता आलेली नाही, अशी टीका केली.