खोटी आश्वासने देणार्‍यांना धडा शिकवा-गडकरी

वेबदुनिया

बुधवार, 7 ऑक्टोबर 2009 (10:45 IST)
निलंगा- मागील निवडणुकीत मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोफत वीज देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. सत्ता येताच पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे विलासराव देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, मोफत वीज देण्याचा जाहीरनामा होता. तो प्रत्यक्षात अंमलात आणायचा नसतो, अशा शब्दात सांगितले. निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देवून जनतेची दिशाभूल करणार्‍या व राज्य दिवाळखोरीत काढणार्‍या आघाडीला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

निलंगा विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ शिरूर अनंतपाळ येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, विजेची गरज असते, तेव्हा भारनियमन असते. विजेची गरज नसते तेव्हा मात्र मुबलक वीज देण्याचे काम हे सरकार करते. महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून मिरवणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अनेक पराक्रम करून महाराष्ट्रात गोंधळ घालण्याचे काम केले.

यावेळी भाजपचे उमेदवार संभाजी पाटील, जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष काटे, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, यवतमाळचे आमदार डॉ. दुर्वे, आमदार टी. पी. कांबळे, रामचंद्र तिरूके, जिल्हा परिषदेचे सदस्य डी.एन. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वेबदुनिया वर वाचा