एक कोटी नवमतदार ठरविणार सत्ता कुणाची?

वार्ता

सोमवार, 12 ऑक्टोबर 2009 (15:43 IST)
महाराष्ट्रावर पुढील पाच वर्षे कुणाची सत्ता असेल याचा फैसला मंगळवारी (ता.१३) होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून २८८ मतदारसंघातील ३ हजार ५३६ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद होईल. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत तब्बल एक कोटीने वाढ झाली आहे. हे नवमतदार कोणाकडे झुकतात यावर निवडणुकीचे पारडे अवलंबून आहे.

सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात होईल. त्यासाठी राज्यात ८ हजार ३०० मतदान केंद्रे असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येईल. राज्यात एकूण सात कोटी ५८ लाख ११ हजार २४५ मतदार असून यात ३ कोटी ६० लाख ७६ हजार ४६९ स्त्रिया आहेत. यातील ८०.३५ टक्के मतदारांकडे मतदान ओळखपत्रे आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्या तब्बल एक कोटीने वाढली आहे.

राज्यात ८४ हजार १३६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून १ लाख १२ हजार ४२५ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आहेत. यातील ३३८६ मतदान केंद्रे संवेदनशील असून ४२८३ अति संवेदनशील आहेत. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पुरेसा पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या ४५ तुकड्या पाठविल्या आहेत. नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घातल्याने हिंसाचाराची शक्यता व्यक्त होत आहे. नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेकरीता ४४ बुलेटप्रूफ गाड्या देण्यात आल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा