महाराष्ट्र दिन : हुतात्म्यांचे स्मरण करण्याचा दिवस, हुतात्म्यांची नावे
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (17:04 IST)
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.