सिनेमा दिग्दर्शनात आता नवी ‘क्रांती’...

शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2015 (16:06 IST)
क्रांती रेडकरचं दिग्दर्शनात पदार्पण... येत्या १० एप्रिलला काकण राज्यभरात प्रदर्शित होणार...
  
तो क्षण आता जवळ येऊन ठेपलाय... ज्याची कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला काकण हा सिनेमा येत्या 10 एप्रिल 2015 रोजी प्रदर्शित होत असल्याची माहिती मुंबईत झालेल्या दिमाखादार सोहळ्यात जाहीर करण्यात आली. या सिनेमाचं आकर्षण म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. 1970च्या काळातील एक प्रेमकथा इतकंच या सिनेमाचं मर्यादित स्वरूप नाही. तो काळ आपल्यासमोर उभा करणं अन् प्रेम या संकल्पनेतील उदात्त स्वरूपाची गोष्ट जीगोष्ट आपल्या आजच्या जगण्यातून हरवत चालली आहे. त्या गोष्टीला अधोरेखित करण्यात आले आहे.

काकण ही एक शोकांतिका आहे... एका तरूण प्रेमी युगुलाची... ज्यांची त्या काळात एकमेकांपासून ताटातूट झाली आहे अन् कालांतराने ते एकमेकांसमोर येतात... त्या काळात तरी नियती त्यांच्यासोबत उभी राहते... नेमकं त्यांच्या प्राक्तनात काय लिहिलंय... हे आपल्याला सिनेमात उलगडत जातं. अत्यंत तरलपणे आयुष्यातील भूतकाळ अन् वर्तमान काळाची सांगड इथे घातली गेल्याचं आपल्याला दिसतं.

कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर हे सारं काही चित्रित करण्यात आलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील मातब्बरांच्या उपस्थितीत या सिनेमाची प्रतिभावंत दिग्दर्शिका क्रांती रेडकरचं कौतुक तर करण्यात आलं पण त्यासोबत काकण डायरी आणि काकणचं मोशन पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलं.

या सिनेमाची पहिली चुणूक टीझर मधून दिसली होती. त्यावेळी या सिनेमाची चांगलीच चर्चा होती. अन् आता या काकण डाय़री अन् मोशन पोस्टरची प्रेक्षकांनी दखल घेतली आहे. त्याच्या वेगळेपणाने आपलं अस्तित्त्वाची दखल घेण्यासाठी भाग पाडलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांमध्ये अशाप्रकारचा सिनेमातील निरागस अन् भाबडा रोमान्स आपल्याला अनुभवता आला नव्हता. अभिनेता जीतेंद्र जोशी आणि ऊर्मिला कानेटकर ही जोडी आपल्यासमोर या सिनेमातून येणार आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीने हे कलावंत आपल्यासमोर आले आहेत.

त्यापेक्षा वेगळ्या स्वरूपात आपल्याला ते जाणवणार आहेत. त्यासोबतच माधवी जुवेकर, अशोक शिंदे, बालकलाकार आशुतोष गायकवाड आणि आकाश बॅनर्जी यांच्या अभिनयाने या सिनेमाला चार चाँद लागले आहेत. या सोहळ्याचं आणखी एक आकर्षणबिंदू ठरला ते म्हणजे ओमकार मंगेश दत्त या गीतकाराचा काकण हा टायटल ट्रॅक. ते स्वरबद्ध केलं आहे ख्यातनाम गायक शंकर महादेवन अन् गायिका नेहा राजपालने तर सूरांची सजावट केली आहे संगीतकार अजय सिंघा यांनी. या गाण्याच्या सूरांनी इथलं वातावरण मंत्रमुग्ध झालं आणि काही क्षणांसाठी काळ गोठला... मन मागे पाहण्यात गुंग झालं अन् काळाच्या मागे गेलं ते ही दबक्या पावलाने ही त्या सूरांची ताकद...

याप्रसंगी दिग्दर्शनाचं आव्हान पेलणारी क्रांती रेडकर म्हणाली की, दिग्दर्शन क्षेत्रात मी अपघाताने आले नाही. सिनेमाच्या तांत्रिक बाबी मला कायम आकर्षित करत राहिल्या होत्या. फिल्ममेकिंगकडे त्यामुळेच वळले. त्यामुळेच ज्यावेळी या सिनेमाची गोष्ट लिहिली अन् माझ्या आप्त स्वकीयांना ऐकवली. माझ्या आईवडिलांनी त्याक्षणी हा सिनेमा तू दिग्दर्शित करण्याचा सल्ला दिला...कारण तू या गोष्टीला न्याय देऊ शकतेस असा त्यांचं म्हणणं होतं. हा सिनेमा पूर्ण होणं हा माझ्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव होता कारण हा ऊन-पावसाच्या खेळासारखा होता पण त्याक्षणी माझी संपूर्ण टीम कुटुंब, या क्षेत्रतील सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून हा सिनेमा पूर्ण करू शकले हे मी जाणीवपूर्वक इथे नमूद करू इच्छिते. माझ्या टीमने प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली आहे, त्यांचे या सिनेमाच्या पूर्णत्त्वामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. त्यांची मी उतराई होऊ शकत नाही.

काकण या सिनेमाचे दिग्दर्शन अन् कथा क्रांती रेडकरचं असून त्यांची निर्मिती मँगोरेंज प्रॉडक्शन्सचे असून कथा-पटकथा- संवाद अन् गीते क्रांती रेडकर आणि मंगेश दत्त यांचे असून बिथिन दास यांची सिनेमॅटोग्राफी आहे तर महेश कुडाळकर यांनी कलादिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

वेबदुनिया वर वाचा