वरूण गांधी यांनी केलेल्या द्वेषमुलक विधानानंतर त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखणार्या भारतीय जनता पक्षाने आता उघड उघड त्यांची बाजू घेणे सुरू केले आहे. कॉंग्रेस व बहूजन समाज पक्ष 'राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या नावाखाली वरूण गांधी यांना सापळ्यात अडकवत असून आपला पक्ष त्यांना सर्व राजकीय व कायदेशीर मदत करेल, असे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी येथे स्पष्ट केले.
वरूण यांच्याबाबतीत जे घडत आहे, ते दुर्देवी असून त्यांच्या छळवणुकीचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
वरूण यांच्या सचिवाकडून मिळालेली माहिती अतिशय प्रक्षुब्ध करणारी आहे. हा संपूर्ण प्रकारच देशाला शरम आणणारा आहे. कॉंग्रेस आणि बसपा त्यांना सापळ्यात अडकवित आहेत, असा आरोप त्यांनी केला.
वरूण यांना भेटण्याची आपलीही इच्छा आहे. मात्र, प्रचाराच्या दौर्यामुळे ते शक्य होत नाहीये. पण आपण वैंकय्या नायडू यांना वरूण यांना भेटण्यास सांगितले असून, त्यांना सर्व प्रकारची राजकीय व कायदेशीर मदत पक्षातर्फे पुरविण्यात येईल, असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे राजनाथ म्हणाले.