लोकसभेत पोहोचण्याचा गुंडांचा 'वाम'मार्ग

कायदे कितीही कडक असले तरी पळवाटाही तितक्याच आहेत. म्हणूनच बिहारमध्ये दोषी ठरलेल्या अनेक गुंड नेत्यांनी आपल्या वामांगींना अर्थात बायकांना खासदार बनविण्याचा 'मार्ग' अवलंबला आहे. या बाहूबली नेत्यांचे वर्चस्व पहाता या बायका निवडूनही येतील कदाचित.

यातील अनेक बाहुबली नेत्यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी केली आहे. म्हणून त्यांनी आपल्या बायकांना निवडणुकीत उतरवले आहे. राष्ट्रीय जनता दलाचा नेता मोहम्मद शहाबुद्दीन लोकजनशक्ती पक्षाचे सूरजसिंह उर्फ सुरजभान, खासदार राजेश रंजन अर्थात पप्पू यादव व माजी खासदार आनंद मोहन यांचा यात समावेश आहे.

शहाबुद्दीन यांनी पत्नी हिना शहाबुद्दीन यांना सीवान या मतदारसंघातून उतरवले आहे. राष्ट्रीय जनता दलाने तिला तिकिट दिले आहे. सूरजभान यांनी पत्नी वीणा देवीला नवादातून लोकसभेत पाठविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. गुन्हेगारी प्रकरणातच तुरूंगात बंद असलेल्या खासदार आनंद मोहन यांनी पत्नी लव्हली आनंदला कॉंग्रेसतर्फे शिवहर लोकसभा मतदारसंघातून उतरवले आहे. राजदचे बाहुबली खासदार पप्पू यादवला न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी केल्यानंतर त्याने पत्नी रंजीत रंजनला कॉंग्रेसच्या तिकिटावर सुपौल मतदारसंघातून लोकसभेवर पाठविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

याशिवाय राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व व आमदार प्रदीप कुमार जोशी या सध्या तुरूंगात बंद असलेल्या नेत्यानेही पत्नी रश्मी जोशी यांना काराकट मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दंगलीप्रकरणी बरीच वर्षे गजाआड असलेल्या माजी मंत्री संजय सिंह यांची पत्नी सुनीला देवी नवादातून लढत आहे.

याशिवाय अनेक बाहुबली उमेदवारांनी आपल्या बायकांना निवडणुकीत उतरवले आहे.

वेबदुनिया वर वाचा